लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: खरीप हंगामामध्ये विविध पिकांच्या उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी कृषी व महसूल विभागातर्फे पीक कापणी प्रयोग राबविण्यात येतो. परंतू यंदाच्या पीक कापणी प्रयोगाच्या कामासाठी जिल्ह्यातील ६८१ ग्रामसेवकांची नकारघंटा असल्याने कृषी विभाग अडचणीत सापडला आहे. या प्रयोगासाठी प्रशिक्षण व तांत्रिक ज्ञान मिळत नसल्याने या कामावर बहिष्कार असल्याचा ग्रामसेवक संघटनांचा दावा आहे.राज्यातील विविध पिकांच्या उत्पादनासंदर्भातील प्रत्यक्ष शेतात निवड केलेल्या प्लॉटवर पीक कापणी प्रयोग राबविल्या जातो. यामध्ये कापूस, तूर, सोयाबीन यासारख्या पिकांचा समावेश असतो. यामध्ये कृषी, महसूल तसेच शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कापणी अहवालानुसार उत्पादन ठरविण्यात येते. पिकांच्या कापणी अहवालामध्ये हेक्टरी उत्पादनानुसार जिल्ह्याच्या विविध भागातील अंदाज घेण्यात येतात. पीक कापणी अहवालानुसार संपूर्ण जिल्हानिहाय माहिती कृषी विभागाने तयार केलेल्या अॅपवर टाकण्यात येते. त्यानंतर राज्यातील पिकांच्या उत्पादनाबाबतचा अहवाल तयार करण्यात येतो. पीक कापणी अहवालानुसार मंडळात झालेले उत्पादन, त्याला मिळणारा हेक्टरी हमी भाव तसेच पीक विम्याचा लाभ सुद्धा या नुसार देण्यात येतो. यावर्षीच्या पीक कापणी प्रयोगाला जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी नकार दर्शवला आहे. खरीप हंगाम २०१९ मध्ये पीक कापणी प्रयोगाच्या कामावर बहिष्कार टाकून संबंधीत गटविकास अधिकाºयाना ग्रामसेवक संघटनांनी एक पत्रही दिले आहे. ग्रामसेवकांच्या या निर्णयामुळे कृषी विभाग अडचणीत सापडला असून, यावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पीक कापणी प्रयोगाचे आवश्यक ते तांत्रिक ज्ञान व प्रशिक्षण ग्रामसेवकांना दिले जात नाही. त्याचबरोबर ग्रामसेवकांवर इतर विकास कामांचा ताणही जादा असतो. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी यंदाच्या खरीप हंगामाच्या पीक कापणी प्रयोगाचे काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.- व्ही. आर. चव्हाण,जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक युनियन, डी.एन.ई. बुलडाणा.
बुलडाणा जिल्ह्यातील ६८१ ग्रामसेवकांचा पीक कापणी प्रयोगाला नकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 2:01 PM