बुलडाणा : जिल्ह्यातील १३ ही तालुक्यांमध्ये दूषित पाण्याचे नमुने आढळले आहेत. येथील भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने केलेल्या अणूजैविक तपासणीत हा प्रकार उघडकीस आला आहे. या अहवालानंतर संबंधित गावांना माहिती देऊन पाणी निर्जंतुकीकरण केले जात असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण विभागाकडून मिळाली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करता यावा, यासाठी ब्लिचिंग पावडरची खरेदी ग्रामपंचायत स्तरावर होणे अपेक्षित आहे. परंतु जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती ब्लिचिंग पावडर खरेदीत टाळाटाळ करतात. त्यामुळे नागरिकांना करण्यात येणारा पाणीपुरवठा ब्लिचिंग पावडरविनाच करण्यात येताे. पावसाळ्याच्या दिवसात तर नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा उपयाेग करणे आवश्यक असते. परंतु जिल्ह्यातील १३ ही तालुक्यांमध्ये भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल ३९३ पाणी नमुने दूषित आढळून आल्याची माहिती आहे. तेव्हा ग्रामंपचायती करतात तरी काय? असा प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहे.
३२७६ पाणी नमुन्यांची तपासणी
जिल्ह्यातील १३ ही तालुक्यांतील गावांमधील नळ योजनेच्या विहिरी, हातपंप आणि विहिरी यातील ३२७६ पाणी नमुने तपासणीसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा या कार्यालयाकडे आले होते. या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३९३ पाणी नमुने दूषित आढळले. यामध्ये बुलडाणा तालुक्यात सर्वाधिक ५० पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत.
साथ राेगाचा धाेका
दूषित पाणी पिल्यामुळे कॉलरासह इतर साथराेग हाेण्याची शक्यता असते. ग्रामीण भागात शुद्ध पाण्याबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे ते पावसाळ्यात शुद्ध पाणी पित नाहीत. दूषित पाणीपुरवठ्यामुळे साथराेगाचा धोकासुद्धा वाढला आहे. तेव्हा ग्रामपंचायतीने आवश्यक तेवढी ब्लिचिंग पावडर खरेदी करून पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे, जेणेकरून नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
असे आढळले दूषित पाणी नमुने
तालुका तपासलेले नमुने दूषित नमुने
बुलडाणा ३०५ ५०
चिखली ३३७ ४४
देऊळगाव राजा २१० २७
लोणार २७६ ३९
सिंदखेडराज २३८ २९
जळगाव जामोद ३६६ ४५
संग्रामपूर १९२ २५
खामगाव १५२ १६
मेहकर २४६ ३३
मलकापूर २६२ २४
मोताळा २६४ २६
नांदुरा २४९ २३
शेगाव १८० १२
पाण्याचे नमुने दूषित आढळल्यानंतर संबंधित गावांना कळविण्यात आले आहे. त्या दूषित पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जणेकरून जलजन्य आजार डोके वर काढणार नाहीत.
- विश्वास वालदे, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, बुलडाणा.