चिखली शहरातील राऊतवाडी स्टॉप ते पंचायत समितीपर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. या रस्त्यावर तहसील, पंचायत समिती, न्यायालय, बीएसएनएल व कृषी अधिकारी कार्यालये आदी महत्त्वाची कार्यालये असल्याने नागरिकांची गैरसोय पाहता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मान्यता मिळाली असून रस्ता कामासाठी ४ कोटी २७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. कोरोना महामारीमुळे सर्व कामे थांबलेली होती, मात्र आता लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे यांनी दिली आहे. या रस्त्याच्या कामासाठी निधी मिळविण्यात त्यांचे पती कुणाल बोंद्रे यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, श्रेयवाद न घेता या कामास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा बोंद्रे यांनी केले आहे. या कामासाठी माजी मंत्री तथा आ. संजय कुटे, आ. आकाश फुंडकर, माजी आमदार चेनसुख संचेती, धृपदराव सावळे यांच्या सहकार्यासह भाजप पक्षश्रेष्ठी व आ. श्वेता महाले यांचे योगदान लाभले असल्याचे स्पष्ट केले आहे. पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस, अभियंता व सहकारी नगरसेवकांच्या पाठबळाने व सातत्यपूर्ण पाठपुराव्याने हा निधी उपलब्ध झाला असून चिखलीकरांना दिलेला ‘खड्डेमुक्त व धूळमुक्त चिखल’चा शब्द आपण पाळत आहोत, असेही नगराध्यक्षा बोंद्रे यांनी स्पष्ट केले.
रस्ताकामासाठी ४ कोटी २७ लाख मंजूर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:48 AM