बुलढाणा : पंजाब, हरयाणासह राजस्थानमध्ये दहशत असलेल्या कुख्यात गँगस्टर नीरज बवानाच्या नावावर बुलढाण्यातील एका म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला कथितस्तरावर धमकावण्यात आले आहे. सोबतच घरासमोरील कारचा काच फोडून ४० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे प्रकरण ९ जुलै रोजी समोर आले आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरातील केशव नगरमध्ये राहणारे म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर पंकज अरुण खर्चे (४२) यांनी या प्रकरणी रविवारी सकाळी ही तक्रार दिली आहे.
त्यानुसार ८ जुलै रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास त्यांना एक कॉल आला होता. त्यात ४० लाख रुपयांची मागणी करण्यात येऊन तुझी सर्व जन्मकुंडली मला माहित असल्याचे अज्ञात व्यक्तीने म्हटले आहे. पैसे दिले नाही तर गेम करून टाकील अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान पंकज खर्चे सकाळी सव्वा सहाच्या सुमाराच्या घराच्या बाहेर आले असता त्यांच्या कारची मागील काच फुटलेली दिसली. कार जवळच एक चिठ्ठी आढळली. त्यात हिंदी भाषेत मजकूर लिहिलेला होता. “तुला फोन केला होता. मी नीरज बवानाचा उजवा हात आहे. तीन दिवसाचा वेळ देतो. ४० लाख रुपये दे. पैसे दिले नाही तर तुझ्या घरी पत्नी आणि तुझ्या दोन मुली राहतात, अशा आशयाची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारासंदर्भात पंकज खर्चे यांनी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी खंडणीसाठी धमकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी केली पाहणीतक्रारीनंतर बुलढाणा शहर पोलिसांनी पंकज खर्चे यांच्या निवास्थानाची पहाणी केली. सोबतच सापडलेली चिठ्टीही ताब्यात घेतली आहे. घटनेच्या अनुषंगाने पोलिस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. यासंदर्भात बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात विचारणा केली असता तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत, प्रकरणातील तथ्य लवकच समोर येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.