लाखनवाडा : पिकावर कीटकनाशकाची फवारणी करताना महिनाभरात सुमारे ४0 जणांना विषबाधा झाल्याची माहिती लाखनवाडा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनोद जाधव यांनी दिली. गेल्या एक महिन्यात जवळपास ४0 लोकांना कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा झाली. त्यापैकी ५0 टक्के रुग्णांना सामान्य रुग्णालय खामगाव येथे हलविण्यात आले. तर काही रुग्णांना जवळपास ४0 पर्यंत इंजेक्शन द्यावे लागले. सध्या सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांवर कीटकनाशकांची फवारणी शेतकरी मोठय़ा प्रमाणात करीत आहेत; परंतु सदर कीटकनाशक फवारणी करताना अंगावर औषध पडल्यामुळे फवारणी करणार्यांना विषबाधा होण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. कपाशी, सोयाबीन, तूर हे शे तकर्यांचे मुख्य पीक आहे. त्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी महागडे औषध घेऊन शेतकरी पिकावर फवारणी करतात; परंतु पीक वाचविण्याच्या नादात शे तकर्यांच्याच जीवाला धोका निर्माण होत आहे.यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे; मात्र पिकावर कीटकनाशकाची फवारणी केल्याशिवाय पर्याय नाही. अगोदरच अत्यल्प पावसामुळे पिकाचे नुकसान होत आहे. काही शेतकरी कृषीपंपाद्वारे पाणी देऊन कसेबसे पीक वाचवित आहेत. त्यातच अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने कीटकनाशकाची फवारणी करणे आवश्यक बनलेले आहे; परंतु कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरजविविध पिकांवरील किडींचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी रासायनिक कीटकनाशके फवारत आहेत; परंतु कीड रोग सहजासहजी आटोक्यात येत नसल्याने अधिकप्रभावी कीटकनाशकांचा शोध शेतकर्यांकडून घेतला जातो. ही कीटकनाशके पिकातील अन्नघटकांसोबतच फवारणी करणारे शेतकरी व शेतमजूर यांच्या जीवासाठीसुद्धा धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे नेमके कोणते कीटकनाशक कोणत्या पिकासाठी फवारावे, फवारणी कर ताना काय काळजी घ्यावी, यासंदर्भात कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
पिकावरील कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होत आहे. त्याकरिता कीटकनाशकाची फवारणी करताना तोंडाला रुमाल बांधून फवारणी करावी व हातात मोजे घालावे जेणेकरून विषबाधा होण्यापासून बचाव होऊ शकेल. - डॉ.विनोद जाधव,वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, लाखनवाडा.