लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात परतीच्या पावसाने अद्द्याप पर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान केले नसले तरी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यात खरीपाचे ४२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या अंतिम अहवालावरून स्पष्ट होत आहे.दरम्यान, सप्टेंबरमधील या पावसामुळे ६१ हजार ६८९ हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला असून ६४ हजार ७१० शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आलेल्या अंतिम अहवालावरून ही बाब स्पष्ट होत आहे.दुसरीकडे जुन, जुलै, ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसून जवळपास २६ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते तर एकट्या सप्टेंबर महिन्यात पावसामुळे ४२ कोटी २२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सिंदखेड राजा, मेहकर, देऊळगाव राजा आणि खामगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. एकट्या सिंदखेड राजा तालुक्यात चार कोटी १८ लाख ७५ हजार रुपयांचे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. मेहकर तालुक्यातही एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अन्य तालुक्यात तुलनेने कमी नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांना सलग दुसऱ्यावर्षी फटका बसला आहे.
सिंदखेड राजातील सर्वाधिक शेतकरी बाधीतसिंदखेड राजा तालुक्यात सर्वाधिक शेतकरी सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे बाधीत झाले आहेत. ६४ हजार ७१० शेतकऱ्यांपैकी एकट्या सिंदखेड राजा तालुक्यातील ५९ हजार ४०१ शेतकऱ्यांचा बाधीतांमध्ये समावेश आहे. मेहकर तालुक्यातील दीड हजार शेतकरी, देऊळगाव राजा तालुक्यातील ७१९ शेतकरी तर खामगाव तालुक्यातील दोन हजार शेतकरी संप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे बाधीत झाले असल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे.