लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनाच्या पर्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आल्या आहेत. इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शाळांची सोमवारी घंटा वाजली, परंतू अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ५० टक्केही उपस्थिती दिसून आली नाही. पॉझिटिव्ह आलेल्या शिक्षकांच्या शाळा दहा दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ४२७ शाळा सोमवारी सुरू करण्यात आल्या.राज्य शासनाच्या निर्णयानुसार सोमवारपासून जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या जिल्ह्यातील ६६१ शाळांपैकी केवळ ४२७ शाळाच सुरू करण्यात आल्या. परंतू पालकांमध्ये कोरोनाची भीती कायम असल्याने अनेक पालकांनी संमत्तीपत्रेच दिलेली नाहीत. यासंदर्भात शिक्षण विभागाकडे आद्याप आकडा प्राप्त झालेला नसला तरी, प्रत्यक्ष शाळेत भेट दिली असता अनेक पालक संमती देण्यास निरुत्साही असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतचे १ लाख ४२ हजार ८०० विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे पालकांमध्ये अद्याप संभ्रम असल्याने मुलांना शाळेत पाठविण्यासाठी बहुतांश पालकांनी नकार दिल्याची माहिती आहे. आहे. अद्यापही शिक्षकांची कोरोना तपासणी सुरू असल्याने शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यातयेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. पालकांचे संमत्तीपत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जात आहे.
बुलडाणा जिल्ह्यात ४२७ शाळांची घंटा वाजली; विद्यार्थ्यांची मात्र पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 4:43 PM