लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन काळातील तीन महिन्याचे वीजबील ग्राहकांना एकत्र देण्यात आले. सदर बील वाढीव असल्याचा आरोप करीत अनेक ग्राहकांनी भरण्यास नकार दिला आहे. तालुक्यात ग्रामीण भागात ४३ टक्के ग्राहकांकडे वीजबील थकीत आहे.लॉकडाऊनच्या काळात महावितरणच्यावतीने ग्राहकांना बील देण्यात आले नाही. अनलॉक झाल्यानंतर मार्च, एप्रिल व मे महिन्याचे वीजबील ग्राहकांना देण्यात आले. मात्र या बीलावर आक्षेप घेत बील वाढीव असल्याचा आरोप ग्राहकांनी केला. महावितरणच्या विरोधात अनेक आंदोलनेही करण्यात आले. महावितरणने १ एप्रिलपासून वीजदरात वाढ केली. दुसरीकडे महावितरणनेही ग्राहकांना देण्यात आलेले बील योग्य असल्याचे सांगत अनेक आॅनलाईन मेळावे व वेबीनार घेतले. सध्या खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागात १४० गावांमधील ३२ हजार वीज ग्राहकांपैकी २३ हजार ग्राहकांकडे बीलाची थकबाकी आहे. ग्राहकांकडे एकूण १३ कोटी ७ लाख रूपयांचे वीजबील देण्यात आले होते. त्यापैकी ५ कोटी ६४ लाख रूपये अजूनही ग्राहकांकडे बाकी आहे. सध्या वीजबील माफ करण्याची माणगी करण्यात येत आहे. दरम्यान थकीत वीज देयके वसुलीसाठी आता महावितरण सोमवारपासून मेळावे घेत आहे. ग्राहकांनी वापर केलेल्या वीजेपोटी जेवढे देयक झाले तेवढे भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
ग्राहकांनी जेवढी वीज वापरली तेवढेच बील देण्यात आले. ग्राहकांनी मागील वर्षीची वीज वापर व यावर्षीचा वीज वापर तपासून बघावा. त्यानंतर त्यांना यावर्षीचे बील जास्त नसल्याचे कळेल. तसेच ग्राहकांना वीजबीलासंदर्भात तक्रार असेल तर त्यांनी संपर्क करायला हवा.- संदीप शेटे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, खामगाव