लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अवर्षणाचा फटका सहन करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १६ मे पर्यंत जवळपास ४३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत सुमारे ९०० शेतकर्यांना हे कर्ज वाटप करण्यात आले आहे.यावर्षी बुलडाणा जिल्ह्यासाठीच्या वार्षिक पतआराखड्यातंर्गत एक हजार ७७३ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट आहे. ३० सप्टेंबर पर्यंत हे पीक कर्ज वाटप करण्याची मुदत आहे. त्यानुषंगाने खरीपाचा हंगाम जवळ येत असल्याने बँकांनीही पीक कर्ज वाटपाच्या दृष्टीने सक्रीयता दाखवणे सुरू केले आहे. शेतकºयांचाही बँकांमध्ये आता गर्दी होत आहे. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची परिस्थिती दोलायमान असल्याने खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील आणि व्यापारी बँकांवरच प्रामुख्याने पीककर्ज वाटपाची मदार आहे. जिल्ह्यातील तीन लाख ७१ हजार ७० शेतकर्यांची मदार ही प्रामुख्याने या २३ बँकांच्या जिल्ह्यातील २४३ शाखांवर अवलंबून राहणार आहे. गेल्या वर्षी खरीप कर्ज वाटपाची मुदत संपेपर्यंत शेतकर्यांना प्रत्यक्षात ३४ टक्केच पीक कर्ज वाटप झाले होते. त्यामुळे यंदा अग्रणी बँकेसह जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, व्यापारी बँकांवर शेतकर्यांना पीक कर्ज वाटपासाठी दबाव वाढलेला आहे.जिल्हा दुष्काळाच्या छायेत असतानाच आठ तालुक्यात दुष्काळ तर उर्वरित पाच तालुक्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आलेला आहे. परिणामी खरीपाच्या हंगामासाठी त्याला पैशाची मोठी निकड आहे. गेल्या वर्षीही घाटाखालील जवलपास सात तालुक्यामध्ये दुष्काळ होता. त्यानंतर यंदाही जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकर्यांचे अर्थकारण बिघडले आहे. त्यातच यंदा कृषी विभागानेही सात लाख ३८ हजार हेक्टरच्या आसपास जिल्ह्यात खरीपाच्या पेर्याचे नियोजन केले आहे. गतवर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे फारसे खत शेतकर्यांनी घेतले नसल्याने यंदा खताचीही उपलब्धता बर्यापैकी आहे, असा कयासही व्यक्त केला जात आहे.दरम्यान, गेल्या नऊ मे रोजी पर्यंत जिल्ह्यातील ८०० शेतकर्यांना ३८ कोटी रुपयापर्यंत पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहेत. दरम्यान, पीक कर्जाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा बँकर्स समितीची बैठक घेऊनही त्या सुचना जिल्हा प्रशासनाने बँकांना दिल्या आहेत. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत निश्चितच पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढेल असाही कयास बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. दरम्यान येत्या काळात पीक कर्ज पुनर्गठनाचाही प्रश्न उपस्थित होणार असून जवळपास ७९ हजार ९६ शेतकर्यांचे ५६० कोटी रुपयांचे पीक कर्जही पूनर्गठीत करावे लागण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४३ कोटींचे पीककर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 2:55 PM