बुलडाणा: अश्ववर्गीय गुरांपासून अन्य प्राणी व माणसामध्ये संक्रमीत होणार्या ग्लँडर आजाराची लागण झालेल्या जिल्ह्यातील संशयीत ४५ अश्वांचे रक्तजल नमुने पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, या आजारामुळे जिल्ह्यातील दोन अश्वांना दयामरण द्यावे लागले असून शेगाव तालुक्यातील एका अश्वाचा प्रारंभीच उपचारा अभावी मृत्यू झाला आहे. परिणामी धोकादायक ठरणार्या या आजाराची अन्यत्र लागून होऊ नये म्हणून जिल्ह्यातून परजिल्ह्यात अश्ववर्गीय गुरांना नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी मोताळा तालुक्यातील सारोळा पीर येथील दोन अश्वांना ग्लँडर या आजाराची लागन झाल्याचा अहवाल पुणे प्रयोग शाळेनंतर हरियाणातील प्रयोगशाळने पाठविला होता. त्यानुसार अखेर जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी या संदर्भात नोटीफिकेशन काढल्यानंतर दोन्ही अश्वांना प्राण्यांच्या संसर्गजन्य आजार कायदा २००९ चा आधार घेत इंजेक्शन देऊन दया मरण देण्यात आले होते. त्यानंतर शेगाव तालुक्यातही ग्लँडर आजाराची लागन झालेल्या एका अश्वाचा मृत्यू झाला होता. त्या पृष्ठभूमीवर शेगाव तालुक्यातील ४० अश्वांचे आणि मोताळा तालुक्यातील सारोळा पीर परिसरातील पाच किमी परिघातील पाच अश्वांचे नमुने हे पुणे येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अद्याप त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. ग्लँडर हा दुर्मिळ आजार या आश्वांना झाल्याच्या पृष्ठभूमीवर परिजल्ह्यातून बुलडाणा जिल्ह्यात अश्ववर्गीय गुरे आणण्यास व बुलडाणा जिल्ह्यातून परजिल्ह्यात अश्ववर्गीय गुरे नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात अश्ववर्गीय गुरांची संख्या किती आहे, ही बाब मात्र स्पष्ट होऊ शकली नाही.
बॅक्टेरियामुळे होणारा आजारअश्वांना हा आजार बॅक्टेरियामुळे होतो. अशा अश्वांच्या सानिध्यात असलेली अन्य गुरे तथा व्यक्तीलाही हा ग्लँडर नावाचा आजार होण्याची भीती असते. व्यक्तीला खोकला, ताप, सर्दी होऊन नंतर त्याचा मृत्यू होण्याची भीती असते. तर काही प्रकरणात त्वचा विकार होऊन ते कधीच दुरुस्त होत नाहीत, अशी धारणा असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या सुत्रांनी स्पष्ट केले. त्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनेने उपरोक्त भूमिका घेतली त्यामुळेच जालना जिल्ह्यातील पशुमेळाव्यात जिल्ह्यातून अश्ववर्गीय गुरे पाठविण्यात आली नाहीत.
पर्यटन स्थळी सर्वाधीक धोकामाथेरान, शेगाव सारख्या पर्यटन स्थळी राहणारी गर्दी पाहता अशा ठिकाणी हा आजार संक्रमीत होण्याची भीती असते. त्यानुषंगाने शेगाव तालुक्यातील ४० अश्वांचे रक्तजल नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप त्याचे अहवाल आले नसल्याचे सुत्रांनी सांगितले.