गॅस दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका
डाेणगाव : मागील काही दिवसापासून घरगुती गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. सध्या स्थितीत एक गॅस सिलिंडर नऊशे रुपयांत मिळत आहे. एवढे महाग सिलिंडर घेण्याची गरिबांची ऐपत नसल्यामुळे शहरासह ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटायला सुरूवात झाली आहे. तर चूल पेटवण्यासाठी सरपण देखील मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातील चांगलीच फरपट होत असल्याचे दिसून येत आहे.
स्वच्छतेवर लघुपट निर्मितीची स्पर्धा
बुलडाणा : ग्रामीण भागात शौचालयाचा नियमित वापराबरोबर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने स्वच्छता विषयक लघुपटांचा अमृत महोत्सव या लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दुर्गासिंग जाधव काेराेना याेद्धा म्हणून सन्मानित
बुलडाणा : कोरोना संक्रमणाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत अहोरात्र सेवा दिल्याबद्दल येथील डॉ. दुर्गासिंग जाधव यांचा पुणे येथील राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
एम़ ई़ एस़ महाविद्यालयात वृक्षारोपण
मेहकर : येथील एम. ई. एस. कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये १२ जुलै रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. गणेश परिहार यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये निंब, सप्तपर्णी, सायकस, पिटोनिया, पाम, कॉकटेल पाम, चाफा, बदाम आदी सौंदर्यीकरण व पर्यावरणास अनुकूल अशा वृक्षाची लागवड करण्यात आली.
नांदुरा तालुक्यातील युवती बेपत्ता
मोताळा : नांदुरा तालुक्यातील गोशिंग येथील चोवीस वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची घटना १३ जुलैच्या सकाळी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी हरवल्याची नोंद केली आहे.