राजू पठाण, सुलतानपूर
गतवर्षी मार्च महिन्यात अचानक काेराेना संसर्गाचे संकट वाढले. त्यामुळे आराेग्य यंत्रणेवर ताण वाढल्याने उपलब्ध सुविधा अपुऱ्या पडू लागल्या हाेत्या. या संकटकाळात डॉ. आर. एन. लाहोटी ग्रुप ऑफ कॉलेजेसचे अध्यक्ष संजय लाहोटी यांनी प्रशासनाला मदतीचा हात दिला. काेविड सेंटरसाठी त्यांनी ४८ बेड दिले तसेच क्वाॅरंटीन सेंटरसाठी वसतिगृह उपलब्ध करून दिले. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत संजय लाहाेटी कोरोनाकाळातदेखील विविध उपक्रम राबवत हाेते. त्यांनी आपल्या संस्थेमार्फत केंद्र शासनाने सुरू केलेल्या कोरोना महामारी निवारण उपक्रमासाठी शासनाकडे २ लाख रुपयांचा धनादेश पाठवून गावात निर्जंतुकीकरण मोहीम राबविली. त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील हॉस्पिटलचे ४८ बेड कोविड सेंटरसाठी आणि वसतिगृह क्वाॅरंटीन सेंटरसाठी देऊ केले. तसेच परिसरातील गावांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क व सॉनिटायझरचे वाटप केले. लॉकडाऊन काळात हॉटेल्स, रेस्टारंट्स आणि धाबे बंद असल्याने आपल्या मूळगावी परतण्यासाठी शेकडो-हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची उपासमार लक्षात घेता आपल्या संस्थेत त्यांच्या झोपण्याची आणि जेवणाची मोफत व्यवस्था करून दिली.