सिंदखेड राजा/ लोणार - लोणार व सिंदखेड राजा नगर पालिकेच्या नगराध्यक्षासह सदस्यांसाठी २४ मार्च रोजी सकाळी साडे सात वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान, दुपारी २ वाजेपर्यंत लोणार पालिकेसाठी ४८ टक्के व सिंदखेड राजा पालिकेसाठी ५० टक्के मतदान झाले.
सिंदखेड राजा नगराध्यक्षपदासह पालिकेच्या १६ सदस्यांसाठी आज मतदान घेण्यात येत आहे. त्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी तीन तर सदस्यासाठी ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान आठ प्रभागात २४ मतदान केंद्रावर मतदान होत आहे. दोन झोनल अधिकाऱ्यांसह ९६ कर्मचारी त्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. सिंदखेड राजा नगर पालिकेच्या या निवडणुकीत १४ हजार ६५ मतदार असून दुपारी दोन वाजेपर्यंत ५० टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
लोणार पालिकेच्या नगराध्यक्ष तथा १७ सदस्यांच्या जागेसाठी २४ मार्चला सकाळी ७.३० वाजेपासून मतदान सुरू झाले आहे. शहरातील २६ बुथवर मतदान होत आहे. सदस्यपदासाठी ८ प्रभागातील १७ जागांसाठी ५८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर १८ हजार ७३७ मतदारांपैकी दुपारी २ वाजेपर्यंत ४८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळपर्यंत मतदानाचा टक्का वाढण्याची आशा आहे.
उन्हाची पर्वा न करता सात हजार मतदारांचे मतदान
सिंदखेड राजा येथे भर उन्हात मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. दुपारी दोन वाजेपर्यंत एकूण सात हजार ६ मतदारांनी उन्हाची पर्वा न करता मतदान केले. यामध्ये ३ हजार ३५० पुरूष तर ३ हजार ६५६ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदान शांततेत
लोणार व सिंदखेड राजा या दोन्ही ठिकाणी दुपारपर्यंत मतदार प्रक्रिया शांततेत होत आहे. दरम्यान, २५ मार्च रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. मतदान केंद्रावर पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवलेला आहे.