चिखली : सुमारे चारशे ते पाचशे किमी उलटे चालत जात देवदर्शन करणारे व पदयात्रेदरम्यान विविध विषयांवर जनजागृतीसाठी प्रसिद्ध असलेले पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी येथील भाविक बापूराव ऊर्फ श्रीपतराव दगडोपंत गुंड हे यावेळी श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी उटले चालत निघाले आहेत. ५ डिसेंबर रोजी त्यांचे चिखलीत आगमन झाले असता, त्यांचे स्थानिकांकडून यथायोग्य स्वागत झाले.
फुरसुंगी येथील भाविक बापूराव गुंड हे गेल्या वीस वर्षांपासून सुमारे ४०० किमीचे अंतर कापून श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरी जात असतात. यंदा त्यांनी विदर्भ पंढरी शेगावकडे प्रस्थान केले आहे. फुरसुंगी येथून सुमारे ४०० किमीचे अंतर उलटे चालल्यानंतर ५ डिसेंबरच्या सकाळी ९ वाजेच्या सुमारास ते चिखलीत दाखल झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार फुरसुंगी येथील बापूराव गुंड हे कापड दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. सामाजिक भान असलेले बापूराव गुंड यांचा २० वर्षांपासून श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी याच पद्धतीने जगण्याचा त्यांचा शिरस्ता आहे. उलट पावली चालण्याच्या पद्धतीसह ते यात्रेत सध्याच्या ज्वलंत विषयांची जनजागृतीही करतात. भक्तीसह जनजागृतीच्या याच अनोख्या पद्धतीसह ते यावेळी विदर्भात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांचा हा हटके प्रवास त्यांच्या घरापासून एकट्यानेच सुरू आहे. त्यांचे यथायोग्य स्वागत झाल्यानंतर खामगाव चौफुलीपासून पुढे शेगावच्या दिशेने ते रवाना झाले.
असा आहे प्रवास
पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी या आपल्या मुळ गावातून १८ नोव्हेंबरपासून बापूराव गुंड यांच्या उलट चालण्याच्या यात्रेस सुरुवात झाली आहे. तेथून शिरूर, अहमदनगर, शेवगाव, जालना, दे. राजामार्गे ते १६-१७ दिवसांनी सुमारे ४०० किमीची यात्रा पूर्ण करून चिखलीपासून खामगावमार्गे संतनगरी शेगावकडे प्रवास चालविला आहे. त्यांची ही यात्रा सुमारे ४८१ कि.मी.ची आहे.
विविध विषयांवर जनजागृती
बापूराव गुंड हे दरवर्षी विविध विषयांवर जनजागृती करतात. दरम्यान शेगाव वारीदरम्यान त्यांनी प्रामुख्याने १०० टक्के मतदान व्हावे, यासह नवमतदारांनी नाव नोंदणी करावी, पर्यावरण, वाहतूक नियम, बेटी बचाव, राष्ट्रीय एकात्मता या विषयांसह सध्या ज्वलंत असलेला प्रश्न मराठा आरक्षण तत्काळ मिळावे सोबतच ओबीसींना न्याय मिळावा या विषयांवर जनजागृतीसह गजाननाकडे प्रार्थना करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.