बुलडाणा : खरीप हंगामता जिल्ह्यात तीन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे १ लाख ४४ हजार ३६५ शेतकऱ्यांचे ९४ हजार ५३६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यापैकी ४७ कोटी ३० लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात आला असून, अद्यापही ४९ हजार ८३९ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ३२ हजार ८४७.८५ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले होते, तर सप्टेंबरमध्ये ६१ हजार ६८९.२४ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे १ लाख ४४ हजार ३६५ शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते.
त्या अ०नुषंगाने नुकसानाची पाहणी करून २३ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय झाला होता. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यासाठी ४७ कोटी ३० लाख ६६ हजार रुपये प्राप्त झाले होते. शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व रक्कम समानपणे टाकण्यात आली होती. दरम्यान, त्यानंतर उर्वरित दुसरा हप्ता अद्याप जिल्ह्याला मिळालेला नाही. रब्बी हंगामात हा निधी मिळाल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. जिल्ह्यातील जवळपास ४९ हजार ८३९ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याला मदत कधी मिळेल, याकडे सध्या शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. पैसेवारी कमी आल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचे स्पष्टच आहे.
दिवाळीत मिळाली होती शेतकऱ्यांना मदत
दिवाळी सणादरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची मदत मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अद्याप जिल्ह्याला मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील मदतीकडे लक्ष लागून राहलेले आहे.
प्राप्त ५० टक्के निधीचे झाले वाटप
पहिल्या टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यासाठीप्राप्त ४७ कोटी ३० लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. एकूण मागणीच्या तो ५० टक्के होता. आता उर्वरित ५० टक्के निधीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. त्यासंदर्भाने प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.