लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शहरातील चांदमारी भागात एका झोपडीत राहणाऱ्या ग्राहकाला महावितरणने चक्क ४९ हजार ४८० रुपयाचे देयक दिले. ग्राहकाने तक्रार करताच वीजबिल कमी करण्यात आले.वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस चर्चेचा विषय ठरत आहे. शहरातील चांदमारी भागात चक्क झोपडी राहणाऱ्या एका ग्राहकाला भरमसाठ बिल देण्यात आल्याने वीज कंपनीचे पितळ उघडे पडले आहे. चांदमारी भागातील गजानन उखर्डा मसतूद हे बकऱ्या चारतात. त्यांच्या घरात एक ट्यूबलाइट, एक टीव्ही आणि पंखा आहे. याव्यतिरिक्त कोणतीच विजेची उपकरणे ते वापरत नाहीत. तसेच त्यांचे झोपडीवजा घर आहे. असे असताना त्यांना महावितरणने ४९ हजार ४८० रुपयाचे देयक दिले. एवढे बिल पाहून ते भांबावून गेले. त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता सुरूवातीला त्यांच्या वीज बिलाला पर्यायच नसल्याचे सांगण्यात आले. तर काही अधिकाऱ्यांनी दहा हजार रुपये भरा असा उरफाटा सल्ला दिला. त्यांना दर महिन्याला सहाशे ते सातशे रुपये बील येत होते. मजुरी करून ते विजबील भरत होते. परंतु लॉकडाऊनच्या काळात ते वीजबिल भरू शकले नाही. त्यानंतर त्यांना मार्च महिन्यात अव्वाच्या सव्वा बिल देण्यात आले.
झोपडीत राहणाऱ्याला ४९ हजारांचे वीजबिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 11:08 AM