कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधांमुळे एसटीची चाकेही थांबली होती. ७ जूनपासून निर्बंधामध्ये शिथिलता आल्याने एसटी बस पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. ७ जूनपासून जिल्ह्यातील सात आगारांमधून लांब पल्ल्याच्या ४६ बस सोडण्यात येत आहेत. एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागातून लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या बस दिवसाला जवळपास २६ हजार कि.मी. अंतर कापण्याचे नियोजन सुरुवातीला करण्यात आले होते. कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने लांब पल्ल्याच्या बस बंद करण्यात आल्या होत्या. केवळ जिल्ह्यांतर्गत बसच सुरू होत्या. त्यातही २२ प्रवाशी आल्यानंतरच बसे पुढे जात होती. त्यामुळे प्रवाशांनीही बसकडे पाठ फिरवल्याने एसटी महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागला. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जिल्ह्यात बरेच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामध्ये एसटी बसही आता पूर्ण क्षमतेने सोडण्यात येत आहे. परंतु ग्रामीण प्रवाशी पाहिजे तेवढ्या प्रमाणात मिळत नसल्याने अनेक बस अद्यापही सुरू करण्यात आल्या नाहीत. आगारात जवळपास ५० टक्के बसच सुरू आहेत.
एकूण बस - ९०
सध्या सुरू असलेल्या बस - ४५
आगारातच उभ्या बस - ४५
एकूण कर्मचारी - ४२५
चालक - १५०
वाहक - १७५
सध्या कामावर चालक - १५०
सध्या कामावर वाहक - १७५
बस कधी सुरू होणार?
ग्रामीण भागात प्रवाशी मिळत नसल्याने अद्यापही अनेक गावांत बस सुरू करण्यात आलेल्या नाहीत. सध्या बुलडाणा आगारातून ग्रामीणमध्ये सैलानी, धाड, चिखली पेठमार्गे, उंद्री, मढ ते धाड या भागात बस सुरू करण्यात आलेल्या आहेत. मात्र, अनेक गावांतील प्रवाशांमधून बस कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रवाशांना खासगी गाड्यांचाच आधार
ज्या गावांना गाड्या नाहीत किंवा कमी संख्येने आहेत, अशा ठिकाणी जाण्यासाठी खासगी गाड्यांचाच आधार घ्यावा लागत आहे. एसटी महामंडळाला किमान २० ते २२ प्रवाशी आवश्यक आहेत. परंतु ग्रामीण भागात जाण्यासाठी एवढे प्रवाशी मिळत नसल्याने बस सोडणे अवघड होते.
काय म्हणतात प्रवास करणारे
मी अकोल्यावरून बुलडाणा बसने आलो. परंतु येथून आता गावात जाण्यासाठी बस मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे खासगी वाहनच करावे लागणार आहे.
गजानन जाधव.
लांब पल्ल्याच्या बस सोडण्यात येत आहेत. परंतु गावात जाण्यासाठी बस मिळत नाही. प्रवाशी नसल्याने बस जाऊ शकत नसल्याचे एसटी महामंडळाच्या चौकशी विभागातून सांगण्यात येते.
अमोल पाटील.