धाड : कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक आहे. सध्या धाड परिसरात आरोग्य विभागाअतंर्गत येणाऱ्या २१ गावांत ५२८ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्याशिवाय कोरोनाच्या भीतीने चाचणी न करता घरीच अंगावर आजार काढणाऱ्या रुग्णांची संख्याही भरमसाट आहे; परंतु अंगावर आजार काढणे धोक्याचे ठरू शकते. धाड येथील ग्रामीण रुग्णालयात दरदिवशी १० ते १२ रुग्ण बाधित आढळून येत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्र चांडोळ या ठिकाणी रॅपिड टेस्टमधून पाच ते आठ रुग्ण आढळून येत आहेत. तथापि या रुग्णालया अंतर्गत येणाऱ्या २१ गावांत कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून, केवळ दहशतीखाली नागरिक कोविडची चाचणी करण्यासाठी समोर येत नाहीत. त्याचा परिणाम कोविड लसीकरणावर जाणवत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या धाड, करडी, बोरखेड या ठिकाणी १९०, कुंबेफळ ४६, सावळी
३८, ढालसावंगी १७, म्हसला ७५, म्हसला खु. तीन, बोदेगाव १२, ढंगारपूर १७, जांब २३, चांडोळ ५१, ईरला २, सातगाव १४, कुलमखेड ६, मौढांळा ४, वरुड ६, शेकापूर २, जामठी १२, पांगरखेड एक, सोयगाव ११ असे ५२८ नागरिक सध्या बाधित आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत; मात्र कोरोनाबाधित असलेल्या नागरिकांना लक्षणे दिसत नसल्यामुळे बहुतांश बाधित रुग्ण सर्रासपणे बाहेर फिरत असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागात वाढतोय कोरोना
ग्रामीण भागात कोरोनाबाबत अजूनही गंभीरता नसल्यामुळे कोरोनाचा कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही. कोरोनापेक्षा कोरोनाची दहशत नागरिकांना धोकादायक ठरत आहे.
मागील चार-पाच दिवसांपासून या ठिकाणी रुग्णालयात कोरोनाच्या लसीचा तुटवडा असल्यामुळे पुरेशी लस उपलब्ध झाली नाही.
धाडमध्ये केवळ १०० डोस उपलब्ध
कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता या परिसरात तातडीने मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम घेऊन नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे. मात्र, धाड येथील ग्रामीण रुग्णालयात मागील पाच-सात दिवसांपासून कोरोना लस उपलब्ध नसल्यामुळे येथील लसीकरण बंद करण्यात आले होते. आज येथे केवळ १०० डोस मिळाले आहेत. त्यापैकी आजच्या लसीकरणानंतर अगदी थोडक्या लस उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. ईफरोज तांबोळी यांनी दिली.
ग्रामीण भागात सतत कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाच्या लसीकरणासाठी लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण
अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे.
डॉ. ईफरोज तांबोळी.