म्युकरमायकोसीस जनजागृतीची गरज
बुलडाणा : कोरोनासारख्या गंभीर आजारावर मात करणाऱ्या रुग्णांवर 'म्युकरमायकोसीस' या आजाराने हल्ला चढविला आहे. जिल्ह्यातही म्युकरमायकोसीसचे रुग्ण सापडत आहेत. म्युकरमायकोसीसवर नियंत्रण गरजेचे असून, या आजाराच्या प्रतिबंधासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता
बुलडाणा : बारावी परीक्षेबाबतचा निर्णय एक ते दोन दिवसांत घेतला जाणार आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षांबाबत नेमका काय निर्णय होतो, याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता लागलेली आहे.
ज्ञानगंगा, हरणी नदीवरील पूल दुरुस्ती
बुलडाणा : वर्णा-सारोळा-श्रीधर नगर-माटरगाव-हरणी (उंद्री) राज्य महामार्ग ५४६ सीसीला जोडणाऱ्या मार्गावरील माटरगावजवळ ज्ञानगंगा नदीवर ४० मीटर लांबीचा पूल नादुरुस्त असल्यामुळे क्षतिग्रस्त झाला आहे. याच मार्गावरील हरणी नदीवर असलेला ३४ मीटर लांबीचा पूलदेखील क्षतिग्रस्त बनला आहे. या दोन्ही पुलांना वाहतुकीमुळे मोठा धोका संभवत असून, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दोन्ही पुलांवरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे.
पेरणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
हिवर आश्रम : खरीप हंगामाची पेरणी जवळ आली आहे. त्यामुळे पेरणीपूर्वी व पेरणी करताना घ्यावयाची काळजी, याबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. पेरणीबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे, यासाठी गावागावात बॅनर लावण्यात आलेले आहेत. तसेच शेतकऱ्यांना कृषी सहायक भूषण लहाने यांनी मार्गदर्शन केले.
भादोला येथे पाणीटंचाई
बुलडाणा : नजीकच्या भादोला येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. बोअरवेलही आटल्या आहेत. हातपंप बंद पडले आहेत. शेतातील विहिरीवरून महिलांना डोक्यावर पाणी आणावे लागत आहे.
धूळ पेरणीकडे शेतकऱ्यांची पाठ
सिंदखेड राजा : तालुक्यात जांभोरा, सोनूशी, अडगावराजा, सोयंंदेव, चांगेफळ या भागात शेतकरी कपाशीची धूळ पेरणी करतात. धूळ पेरणी झालेल्या कपाशीवर लवकरच बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढतो. पर्यायाने उत्पादनात घट होते. परंतु यंदा धूळ पेरणीकडे शेतकऱ्यांची पाठ दिसून येत आहे.
रस्त्याचे अर्धवट काम
बुलडाणा : स्थानिक बसस्थानक ते चिंचोले चौक मार्गावर जागोजागी खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत होती. आता हा रस्ता सिमेंटचा बनविण्यात आला आहे. परंतु या रस्त्याचे काम सर्क्युलर रोडपर्यंत होणे आवश्यक असतानाही अर्धाच रस्ता झाला आहे.
गावरान आंब्याची मागणी वाढली
धाड : सध्या आंब्याचा हंगाम सुरू आहे. बाजारात विविध वाणांचे आंबे सुद्धा विक्रीसाठी आहेत. मात्र इतर वाणांपेक्षा गावरान आंब्याला चांगली मागणी आहे. ग्रामीण भागातून शेतकऱ्यांनी गावरान आंबे विक्रीला आणले आहेत.
पतितपावन मोक्षधाम बहरला वृक्षांनी !
मेहकर : पैनगंगा नदीच्या काठावरील पतितपावन मोक्षधाम वृक्षांनी बहरला असून, परिसरात नंदनवन फुलल्यासारखे दिसत आहे. मुक्तिधाम सुधार समिती मोक्षधामाचे नियोजन करीत असून, सर्व सोयीसुविधांची व्यवस्था केली आहे.
बसस्थानकाचे सौंदर्यीकरण थंडबस्त्यात
बुलडाणा : जिल्ह्यातील काही बसस्थानकाच्या सौंदर्यीकरणाचे काम थंडबस्त्यात पडले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे काम रखडले आहे, तर काही ठिकाणच्या कामाचा कालावधी सुद्धा संपलेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी लोणार बसस्थानकाचे काम पूर्ण झाले आहे.