- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनामुळे गेल्या वर्षी खंड पडलेल्या अतिसार (डायरिया) नियंत्रण पंधरवाडा मोहिम यावर्षी अधिक गांभिर्यपूर्वक राबविण्यात येणार असून १५ जुलै पासून या मोहिमेस जिल्ह्यात प्रारंभ होत आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात वर्षाकाठी जवळपास ५७ बालकांचा डायरियामुळे मृत्यू होतो. त्या पार्श्वभूमीवर हे प्रमाण शुन्य टक्यावर आणण्यासाठी आरोग्य विभागाने या वर्षी ही मोहिम अधिक जोरकसपणे राबविण्याचा निर्धार केला आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात जवळपास २०१४ पासून अतिसार अर्थात डायरिया नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येत असतो. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे या मोहिमेला ब्रेक देण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी ही मोहिम अधिक गांभिर्यपूर्वक राबविण्याचा निर्धार आरोग्य विभागाने केला आहे. देशामध्ये बालमृत्यूचे प्रमाण पाहता त्यापैकी दहा टक्के मृत्यू हे डायरियामुळे होत असल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढलेला आहे. त्या आधारावर दरवर्षी राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येतो. यामध्ये अतिसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तथा रुग्णालयात अतिसार झालेल्या बालकाला केव्हा दाखल करणे आवश्यक आहे. सोबतच अेाआरएस आणि झिंक गोळ्यांचे डोस नियमितपणे कसे द्यायचे यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन जिल्ह्यातील १८०० आशा वर्कसच्या माध्यमातून घरोघरी जाऊन करण्यात येणार आहे. अेाआरएसचे द्रावण अर्थात क्षारसंजिवनी कशी तयार करायची याचेही प्रात्याक्षीक दिल्या जाणार आहे. डायरिया प्रामुख्याने उन्हाळा आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना होतो.
१५ जुलै ते ३० जुलै दरम्यान जिल्ह्यात अतिसार नियंत्रण मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये डायरियामुळे होणाऱ्या बालकांच्या मृत्यूचे प्रमाण हे शून्य टक्क्यांवर आणण्याचे आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. सोबतच या पंधरवाड्यात जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये अेाआरएस व झींक कॉर्नर उभारण्यात येऊन याविषयी जनजागृती केली जाणार आहे.- डॉ. रविंद्र गोफणे, माता व बालसंगोपन अधिकारी, बुलडाणा