उद्धव फंगाळ । लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींनी विद्युत देयकाचा भरणा न केल्याने महावितरणकडून या ५८ ग्रामपंचायतींचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. संबंधित ग्रामपंचायतींकडे वीज बिलाचे जवळपास २ कोटी ८४ लाख रुपये थकीत आहेत. विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत गाव स्तरावर पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित होत आहे.तालुक्यात ९८ ग्रामपंचायती असून, जवळपास १०९ पाणी पुरवठ्याचे वीज कनेक्शन आहेत. अनेक ग्रामपंचायतींचे विद्युत देयके थकीत असल्याने त्या त्या ग्रामपंचायतचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यामध्ये तालुक्यातील अकोला ठाकरे, परतापूर, पिंप्रीमाळी, उकळी, घाटबोरी, सुकळी, मुंदेफळ, हिवरा खु., शेलगाव काकडे, विवेकानंद नगर, विश्वी, वरूड, लोणी गवळी, गुंज, गोहगाव, मादणी, पारंगखेड, वाडी मोसंबी, बरटाळा, लोणी गवळी, विठ्ठल वाडी, वरूडी, वडगाव माळी, मोहना बु., सावंगी माळी, पिंपळगाव, हिवरा बु., कासारखेड, सावत्रा, वडाळी, जामगाव, सारंगपूर, बेलगाव, मांडवा फॉरेस्ट, सुळा, डोणगाव, साब्रा, जैताळा, घुटी, सारंगपूर, सुभाणपूर, मोळा, सावंगीविहिर, गौंढाळा, उसरण, नागझरी, पारखेड, नांद्रा, चायगाव, भोसा, कनका या ग्रामपंचायतींचे वीज कनेक्शन खंडित करण्यात आले आहे. या ग्रामपंचायतींकडे जवळपास २ कोटी ८४ लाख रुपये थकीत आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होत आहे. अशा वेळी अनेक ग्रामपंचायतींचे पाणी पुरवठ्याचे वीज कनेक्शन बंद केल्याने गावकºयांची पाण्यासाठी धावपळ होत आहे.
सवणा येथील विद्युत पुरवठा बंद!सवणा : येथील पथदिवे २७ फेब्रुवारीपासून बंद असल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊून पथदिवे सुरू करावे, अशी मागणी श्याम करवंदे तसेच ७५ गावकºयांनी ग्रामपंचायतकडे निवेदनाद्वारे केली आहे. चिखली तालुक्यातील सवणा ग्रामपंचायतचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने रात्री रस्त्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्यामुळे गावकºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यासंदर्भात सवणा सरपंच नंदा हाडे व सदस्यांना विचारणा केली असता विद्युत देयक जि.प.मार्फत शासन भरणा करीत असते; परंतु शासनाने जि.प.ला अनुदान न दिल्यामुळे जि.प.ने सदर बिल भरणा केले नाही, त्यामुळे विद्युत विभागामार्फत विद्युत पुरवठा खंडित केल्याचे सांगण्यात येते. येत्या आठवड्यात विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
अनेक ग्रामपंचायतींकडे विद्युत बिलाचे लाखो रुपये थकीत आहेत. मार्च महिन्यामध्ये थकीत विद्युत बिलाची वसुली सुरू आहे. संबंधित ग्रामपंचायतने विद्युत बिलाचा भरणा केल्यास वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यात येईल.- प्रशांत कलोरे,अभियंता महावितरण, उपविभाग, मेहकर