- अनिल गवई
खामगाव: घनकचऱ्याचा प्रश्न कसा सोडवावा, हे मोठमोठ्या शहरांनाही अद्याप सुचले नसताना, खामगाव शहराची ही समस्या मात्र लवकरच निकाली निघण्याची चिन्हे आहेत. मार्स प्लानिंग अॅन्ड इंजिनिअरिंग सिस्टीम प्रा.लि. ने खामगावसाठी ५ कोटी ९६ लाख रूपये खर्चाचा डिपीआर अर्थात डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला असून, तो मंजुरातीसाठी पाठविण्यात देखिल आला आहे. या डिपीआरला मंजुरात मिळाल्यानंतर खामगाव शहर कचरामुक्त होण्यास मोलाची मदत होणार आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक शहर स्वच्छ करण्यावर शासनाचा भर आहे. यासाठी नानाविध प्रयत्न केल्या जात आहे. असे असले, तरी घनकचºयाचा प्रश्न सोडविता- सोडविता मोठमोठ्या शहरांच्या नाकीनऊ आले आहेत. कचरा प्रकरणांवरून अनेक मोठ्या शहरांमध्ये रणकंदन माजल्याची उदाहरणेही ताजी आहेत. दररोज निर्माण होणाºया सुक्या व ओल्या कचºयाची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे यावर प्रभावी उपाययोजनांसाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून कचºयाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या अनुषंगाने प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतुद शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. याअंतर्गत कोणत्या शहराला किती निधीची गरज आहे, हे ठरविण्यासाठी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे काम शासनाकडून मार्स प्लानिंग अॅन्ड इंजिनिअरिंग सिस्टीम प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने खामगाव शहराचा डीपीआर नुकताच तयार केला आहे.
५३ नव्या गाड्या येणार !
तयार करण्यात आलेल्या डीपीआरनुसार शहरात दररोज निर्माण होणारा ओला तसेच सुका कचरा उचलण्यासाठी ५३ नव्या गाड्या खरेदी करण्याचे प्रयोजन आहे. यात २० टिप्पर तर ३३ छोट्या घंटा गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या प्रभागनिहाय कचरा गोळा करतील. कचरा विलगीकरणाची सोय असलेल्या यामधील काही गाड्या राहणार आहेत.
डंपींग ग्राऊंड, साईट डेव्हलपमेंट करिता खर्च
तयार करण्यात आलेला डिपीआर मंजुर झाल्यास डंपींग ग्राऊंडवर अर्थात कचरा प्रकल्पावर १ कोटी २१ लाख रूपये खर्च होतील. सदर ठिकाणी यार्ड व इतर कामावर हा खर्च असेल. कचरा साठविण्यासाठी अतिरिक्त जागा खरेदीसाठी ४० लाख रूपये खर्च होईल. साईट डेव्हलपमेंटसाठी १ कोटी १६ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. यात सुरक्षाव्यवस्था, टॉयलेट, इमारत, अग्निशमन, पाणी, विजपुरवठा आदी कामे करण्यात येतील.
जनजागृतीसाठी ५४ लाख
शहर स्वच्छ करण्यासाठी या प्रकल्पाबाबत लोकांमध्ये जनजागृती होण्याची गरज आहे. पालीकेच्या आरोग्य विभागाकडून ही जनजागृती करण्यात येणार असून त्यासाठी ५४ लाख रूपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. वरिल बाबींसह इतर कामांसाठी डीपीआर नुसार येणारी ५ कोटी ९६ लक्ष रूपयांची रक्कम खर्च करण्यात येणार आहे.
खास सभेची मान्यता !
नगर पालीकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत येणाºया घन कचºयाचा प्रश्न सोडविण्यासाठी या कंपनीने ५ कोटी ९६ लाख रूपये खर्चाचा अहवाल तयार केला आहे. या अहवालाला २५ जून २०१८ रोजी खामगाव नगरपालिकेने ठराव घेवून मंजुरी दिली असून सदर अहवाल जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आला आहे.
घन कचरा व्यवस्थापनासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल तांत्रिक मान्यतेसाठी वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला आहे. तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर पुढील उपाययोजना करण्याचा प्रयत्न राहील. शहरासाठी ही मोठी उपलब्धी ठरेल.
-धनंजय बोरीकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव.