लोकमत न्यूज नेटवर्क, मेहकर (जि. बुलढाणा)/छत्रपती संभाजीनगर: शेगावला देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबाची कार समृद्धी महामार्गावर चार वेळा उलटल्याने छत्रपती संभाजीनगर येथील सहा जण ठार व सात गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना मेहकर-सिंदखेडराजादरम्यान शिवणी पिसाजवळ रविवारी सकाळी ८ वाजता घडली.
मृतांमध्ये हौसाबाई भरत बर्वे (६५), श्रद्धा सुरेश बर्वे (२८), जान्हवी सुरेश बर्वे (११, तिघेही रा. एन ११, हडको), प्रमिला राजेंद्र बोरुडे (५२), किरण राजेंद्र बोरुडे (२८) आणि भाग्यश्री किरण बोरुडे (२५, तिघेही रा. एन ९, हडको) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये कारचालक सुरेश भरत बर्वे (३५), नम्रता रवींद्र बर्वे (३२), रुद्र रवींद्र बर्वे (११), साैम्य रवींद्र बर्वे (४), जतीन सुरेश बर्वे (४), वैष्णवी सुनील गायकवाड (१९), यश रवींद्र बरवे (१०) यांचा समावेश आहे. पिसाजवळच्या पुलाजवळील खचक्यामुळे चालक सुरेश यांचे कारवरील नियंत्रण सुटले.
याच ठिकाणी दुसरा अपघात
याच घटनास्थळावर १६ जानेवारीला झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले होते. त्यामुळे अपघातस्थळाची अभियंत्यामार्फत पाहणी करावी, महामार्ग पोलिस यंत्रणा दक्ष ठेवावी, अशी मागणी जयचंद बाठिया यांनी केली आहे.
‘श्रीं’च्या दर्शनाची ओढ अधुरीच...!
बाेरुडे आणि बर्वे कुटुंबीयांनी शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनाला जाण्याचे अगोदरच्या दिवशीच नियोजन केले. घरचीच कार असल्याने रविवारी पहाटेच निघण्याचे ठरविले. लवकर पोहोचल्यास दर्शन होईल, या हेतूने समृद्धी महामार्गाने जायचे ठरले; मात्र हा प्रवास अखेरचा ठरला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"