लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या २४ तासांत बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालयात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून, गंभीर अवस्थेत कोविड रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. सहा जणांपैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, दोघांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. एका मृतकाचा अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या तूर्तास २०६ दाखविण्यात आली असली, तरी डेथ ऑडिट समिती गेल्या २४ तासांत झालेल्या मृत्यूसंदर्भात समीक्षा करून नेमका आकडा काय निश्चित करते, याकडे सध्या लक्ष लागून राहिले आहे; मात्र कोविड समर्पित रुग्णालयात २४ तासांत सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे कोविड संसर्गाबाबत जनसामान्यांनी आता अधिक खबरदारी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.यासंदर्भात कोविड समर्पित रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला असता, गेल्या २४ तासांत ६ जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यातील तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, एकाचा अहवाल निगेटिव्ह होता तर अन्य दोघांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व मृत व्यक्तींचे वय हे ६० वर्षांवरील असून, दुर्धर आजार असणाऱ्यांची संख्या यात अधिक आहे. या मृत्यूंनंतर डेथ ऑडिट कमिटीचीही बैठक झाली असल्याची माहिती आहे. मात्र, त्यात नेमकी कोणती भूमिका घेण्यात आली? ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. दुसरीकडे, जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू पावलेल्यांमध्ये बहुतांश जण हे दुर्धर आजाराने ग्रस्त होते, असेही आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.
बुलडाणा कोविड रुग्णालयात २४ तासांत ६ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 11:32 AM