संदीप वानखडे, बुलढाणा : पवित्र पाेर्टलवर सुरू असलेली १९६ व्यवस्थापनाच्या भरतीत अनेक अडथळे येत असून आता ६ हजार ९१९ उमेदवारांना तांत्रिक कारणांमुळे पुन्हा प्राधान्यक्रम भरावे लागणार आहे. त्यासाठी ५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
पवित्र पाेर्टलवर २०१७ पासून सुरू झालेली शिक्षक भरती अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यातच आता तारीख पे तारीख सुरू झाले आहे. १९६ व्यवस्थापनाच्या रिक्त जागांसाठी १३ ते २६ एप्रिलपर्यंत प्राधान्यक्रम उमेदवारांकडून भरुन घेण्यात आले हाेते. मे महिन्यात गुणवत्ता यादी जाहीर हाेण्याची अपेक्षित असताना आता ६ हजार ९१९ उमेदवारांच्या प्राधान्यक्रमात तफावत असल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे या उमेदवारांना आता पुन्हा प्राधान्यक्रम जनरेट करून लाॅक करावे लागणार आहे. त्यासाठी ३० मे ते ५ जूनपर्यंत सुविधा पाेर्टलवर देण्यात आली आहे.
पात्र नसतानाही भरले प्राधान्यक्रम
१९६ व्यवस्थापनासाठी प्राधान्यक्रम लाॅक करणाऱ्या अनेक उमेदवारांनी पात्रता नसतानाही काही शाळांच्या रिक्त जागांना प्राधान्यक्रम दिले आहेत. त्यामुळे आता या उमेदवारांची संख्या कमी हाेणार आहे. यामध्ये २० पेक्षा जास्त अधिक प्राधान्यक्रमांची संख्या असलेले ६६ उमेदवार बाद हाेणार आहेत. तसेच ७ उमेदवार वाढणार आहेत. ११ ते २० प्राधान्यक्रमात तफावत आलेले ७२२ उमेदवार कमी हाेणार आहेत तर ११ उमेदवार वाढणार आहेत. ६ ते १० तफावत असलेले ४६४ कमी हाेणार तर २१ वाढणार आहेत.