लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोनामुळे गेल्या २४ तासात १२ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा येथील स्मशानभूमीची पाहणी केली असता येथे पार्थिव जाळण्यास जागा कमी पडत असल्याचे चित्र समोर येत आहे. दरम्यान गेल्या २० दिवसात येथील संगम तलावस्थित स्मशानभूमीत ६० मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.प्रत्यक्ष स्मशानभूमीमध्ये आणलेल्या पार्थिवांच्या नाेंदी पाहता ही बाब स्पष्ट झाली आहे. या ६० मृत्यूंपैकी कोरोनामुळे नेमके किती मृत्यू झाले आहेत हे स्पष्ट होत नसले तरी बोथारोडवरील हिंदू स्मशानभूमीत जागा कमी पडत असल्याचे चित्र आहे. येथील स्मशानभूमीत पार्थिवाच्या दहनासाठी चार पिंजरे आहेत. मात्र त्या स्मशानभूमीतील मुख्य अंत्यविधीच्या जागेव्यतिरिक्त परिसरात लगतच जागोजागी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे स्पष्ट जाणवत आहे. बुधवारी प्रत्यक्ष स्मशानभूमीत पाहणी केली असता जवळपास सहा पार्थिंवार गेल्या २४ तासात अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याचे स्पष्ट दिसत होते. तर दोन चिता अद्यापही जळत असल्याचे समोर आले. स्मशानभूमीमधील मृतांच्या नोंदणी बुकाची पाहणी केली असता त्यात १ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान ६० जणांवर अंत्यसंस्कार झाल्याच्या नोंदी समोर आल्या आहेत. त्यामुळे बुलडाण्याची एकंदरीत स्थिती आता बिकट होते की काय, अशी शंका व्यक्त होत आहे. स्मशानभूमीतील मुख्य अंत्यसंस्काराच्या जागेवरील चार पिंजऱ्यांलगतच जेथे जागा मिळेल तेथे मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याचे एकंदरीत चित्र येथे दिसून आले.
सहा दिवसात ४० मृत्यूबुलडाणा जिल्ह्यात कडक निर्बंध व रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर २१ एप्रिलपर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. १९ एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनामुळे केवळ एकाचा मृत्यू झाला होता. हा अपवाद वगळता १४ एप्रिलपासून आजपर्यंत सातत्याने कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांचा आकडा वाढत असल्याचे चित्र आहे.