बुलडाणा : राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियान अधिकारी -कर्मचारी महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी ११ एप्रिलपासून जिल्हा परिषदेसमोर कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले. जिल्ह्यातील ६५० कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढणार आहे. एनआरएचएम अंतर्गत गेल्या १२ वर्षांपासून कंत्राटी अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्ह्यामध्ये सर्व आरोग्य संस्थांमध्ये ६५० कर्मचारी काम करीत आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, आरोग्य सेविका, डाटा एंट्री आॅपरेटर, कार्यक्रम सहाय्यक, स्टाट नर्स, एलएचव्ही, विविध कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक, समुपदेशक आदी संवर्गातील अधिकारी कर्मचाºयांचा समावेश आहे. अत्यंत कमी मानधनावर ग्रामिण भागात हे कर्मचारी सेवा देत आहेत. मात्र त्यांच्या विविध मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहे. मागण्या मान्य करण्यासाठी बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले असून समस्या मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याची भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र राऊत, विजय सोनोने, गोपाल पाटील, शरद पाटील, टाले, आय. ए. शेख, सचिन हिवाळे, पुष्पा राऊत, उज्वला थोरात, रामेश्वर बांबला, अमर राठोड, वैभव खुजे, एस. के. मोरे, मनोज ब्रम्हपुरीकर यांच्यासह विविध संवर्गातील अधिकारी, कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले.