कॅशलेस व्यवहार करण्यासाठी सरकारच्या वतीने प्राेत्साहन देण्यात येत आहे. तसेच विविध ॲपच्या माध्यमातून नागरिकही ऑनलाईन व्यवहार माेठ्या प्रमाणात करीत आहेत. गत काही दिवसांपासून फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. फेसबुकच्या माध्यमातून फेक अकाऊंट काढून पैसे मागण्याचे प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आले हाेते. तसेच बँकेतून बाेलत असल्याची बतावणी करून अनेकांनाकडून एटीएमची माहिती व पासवर्ड विचारून फसवणूक करण्यात येत आहेत. काही जणांना कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात येत आहे. कमकुवत पासवर्ड असल्याने, तसेच लाेभापायी अनेकजण फसविले जात असल्याचे चित्र आहे. सायबर सेलसह बँकांही वारंवार आवाहन करीत असले तरी भामट्यांनी केलेल्या काॅलवर अनेकजण माहिती देऊन फसवणूक करीत आहेत. तसेच सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. सायबर सेलकडे कामाचा वाढता व्याप पाहता कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.
फेसबुकवर फसविल्याच्या सर्वाधिक तक्रारी
फेसबुकवर एखाद्याच्या नावाने बनावट अकाउंट काढून त्याच्या मित्रांना पैसे मागण्याचे प्रकार वाढले आहेत. या संदर्भात सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. तसेच एटीएमची माहिती विचारून फसवणूक, कमी व्याजदराचे आमिष दाखवून फसवणूक, आदी वाढले आहे. आमिषाला बळी पडल्याने अनेकांची फसवणूक हाेत असल्याचे चित्र आहे. बँकांनी १० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढल्यास संदेश पाठविण्याची सुविधा केली आहे. त्यामुळे ग्राहकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
पासवर्ड कमकुवत ठेवू नये
अनेकजण आपल्या ऑनलाईन बँकिंग किंवा इतर ॲपचा वापर करताना पासवर्ड साेपा ठेवतात. अनेकजण आपला माेबाईल क्रमांकच पासवर्ड ठेवतात. हॅकर्ससाठी असे पासवर्ड शाेधने साेपे जाते. त्यामुळे कुठल्या ॲपचा वापर करताना साेपा पासवर्ड ठेवू नये, असे आवाहन सायबर सेलने केले आहे. जिल्ह्यात सन २०२० मध्ये एकूण ६२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
कुठल्याही आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये. कमी व्याजदाराने कुणीही कर्ज देत नाही. तसेच आर्थिक व्यवहारासाठी विविध ॲप वापरताना त्यांचा पासवर्ड साेपा ठेवू नये. आपली आर्थिक फसवणूक हाेऊ नये, यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी सावध राहावे. कुठल्याही बनावट काॅलला उत्तर देऊ नका, आपल्या बँक खाते आणि एटीएमची माहिती कुणालाही देऊ नका. फसवणूक झाल्यास सायबर सेलकडे तातडीने तक्रार करा.
अरविंद चावरीया, पाेलीस अधीक्षक, बुलडाणा