बुलढाणा : फेसबुकवर मैत्री करत गिफ्ट देण्याच्या बहाण्याने बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील एका पॅथॉलॉजी चालकास ६२ लाख ६७ हजार ७०० रुपयांनी एकाने फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बुलढाणा सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात विविध कलमान्वेय गुन्हा दाखल केला आहे. अवघ्या दीड महिन्यात अज्ञाताने हा कारनामा केला आहे.मेहकर शहरातील गजानन नगरमध्ये रहाणारे दीपक शिवराम जैताळकर (५०) यांची ही फसवणूक झाली आहे. मेहकरमधील डीपीरोडवर त्यांची पॅथॉलॉजी आहे. २३ जून रोजी जैताळकर यांना मारीया जोन्स यांची फेसबुकवर एक फ्रेन्डरिक्वेस्ट आली होती. ती जैताळकर यांनी स्वीकारली. संबंधित महिलेने आपण फार्मासिस्ट असल्याचे सांगितले. त्यामुळे सम व्यावसायिक असल्याने त्यांची फेसबुकवर मैत्री झाली. ११ जुलै पर्यंत सर्वकाही सुरळीत होते. दरम्यान त्यानंतर संबंधित महिलेने आपले प्रमोशन झाले असून त्यामुळे आनंदी आहोत. त्यानुषंगाने एक गिफ्ट पाठवायचे असल्याने जैताळकर यांना त्यांच्या घराचा पत्ता संबंधित महिलनेने मागितला. जैताळकर यांनी त्यांच्या पॅथॉलॉजी लॅबचा पत्ता दिला होता.दरम्यान १३ जुलै रोजी जैताळकर यांना त्यांचे पार्सल दिल्ली एअरपोर्टवर आल्याचे समजले. सोबतच ३५ हजार रुपये कस्टम क्लिअरसाठी द्यावे लागणार असे सांगण्यात आले. सोबतच पार्सलमध्ये ६५ हजार (जीबीपी) ग्रेट ब्रिटन पाऊंड असल्याचे सांगण्यात आले. त्या पोटी वेळोवेळी जैताळकर यांच्याकडून ॲन्डी मनी लॉर्न्डींग सर्टीफिकेट, सर्व्हीस चार्जेस, ज्युडिशियल ॲप्रुवल, एटीएम मास्टर कार्डच्या नाखाली अज्ञात व्यक्तींनी तब्बल ६२ लाख ६९ हजार ७०० रुपये अज्ञाताने उकलळ्याचे जैताळकर यांच्या लक्षात आले. १३ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान त्यांच्याकडून ठरावीक कालावधीनंतर रकमा उकळण्यात आल्या.दरम्यान हा प्रकार लक्षात येताच जैताळकर यांनी त्यांचे मित्र ॲड. एल. पी. ठोकरे व इतरांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जैताळकर यांनी बुलढाणा सायबर पोलिस ठाण्यात १५ ऑगस्ट रोजी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बुलढाणा सायबर पोलिस करत आहेत.
फेसबुकवर मैत्री, गिप्ट देण्याच्या बहाण्याने ६२.६९ लाखांची फसवणूक; मेहकर शहरातील पॅथॉलॉजी चालकास फसवले
By निलेश जोशी | Published: August 16, 2023 3:25 PM