संदीप वानखडे
बुलडाणा : जिल्ह्यात काेरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने लसीचा दुसरा डाेस घेण्याकडे अनेकजण कानाडाेळा करीत आहेत. त्यामुळे, जिल्ह्यातील तब्बल ६५ हजार ७१९ जणांनी लसीचा दुसरा डाेसच घेतला नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात काेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिन लसीचे लसीकरण करण्यात येत आहे. काेविशिल्डचा दुसरा डाेस ८४ दिवसांनी, तर काेव्हॅक्सिनचा दुसरा डाेस २८ दिवसांनी देण्यात येत आहे. पहिला डाेस घेतल्यानंतर अनेक जण दुसरा डाेसच घेत नसल्याचे चित्र आहे. यासाठी आराेग्य विभागाने विविध उपाययाेजना सुरू केल्या आहेत. दुसऱ्या डाेससाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना आराेग्य कर्मचाऱ्यांकडून फाेन काॅलही करण्यात येत आहे.
दुसरा डाेस घेणेही तितकेच आवश्यक
काेराेना लसीचे दाेन्ही डाेस घेणे आवश्यक असल्याचे आराेग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
दाेन्ही डाेस घेतल्यानंतर १४ दिवसांनी अँटिबाॅडी तयार हाेतात. एक डाेस घेतला असता, त्याचा फारसा उपयाेग हाेत नाही.
नेमकी अडचण काय ?
जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अनेक जण दुसरा डाेस घेण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे चित्र आहे. अनेकांनी माेबाईल क्रमांक दुसराच दिल्याने, त्यांना आपला डाेस कधी आहे, याची माहिती नाही. तसेच काही जणांना माहिती असूनही ते जाणीवपूर्वक दुसरा डाेस घेण्यास टाळाटाळ करीत आहेत.
दाेन्ही डाेस आवश्यक
काेराेना लसीचे दाेन्ही डाेस घेणे आवश्यक आहे. दुसऱ्या डाेससाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या संस्थेला याविषयी माहिती देण्यात आली आहे.दुसऱ्या डोससाठी विशेष लसीकरण सत्र आयोजित करून लवकरच या लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येईल.
- डाॅ. रवींद्र गाेफणे, जिल्हा लसीकरण अधिकारी, बुलडाणा
कोविशिल्ड
नागरिक : २०८५९
फ्रंटलाईन कर्मचारी : १३९७
आरोग्य कर्मचारी : ७८७
एकूण : २३०४३
कोव्हॅक्सिन
नागरिक : ४०७९०
फ्रंटलाईन कर्मचारी : १५९२
आरोग्य कर्मचारी : २९४
एकूण : ४२६७६