लसीकरण करून संसर्गापासून सुरक्षित रहा - शिंपणे
देऊळगाव राजा : कोरोना संसर्ग संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात धोकादायकरीत्या वाढत असून, बचावात्मक उपाययोजनांसह लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल. नागरिकांनी लसीकरण करून घ्या, संसर्गापासून स्वतःचे व इतरांचे संरक्षण करा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य शीला शिंपणे यांनी केले.
नेटवर्क राहत नसल्याने ग्राहक झाले त्रस्त
धामणगाव धाडः परिसरात सर्वच मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क राहत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. वारंवार काॅलमध्येच बंद हाेत असल्यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जिओचे नेटवर्कच गायब झाल्याचे चित्र आहे.
केंद्र बंद, आधारकार्ड दुरुस्तीसाठी अडचणी
दुसरबीड : आधार केंद्र बंद असल्याने नागरिकांना आधारकार्ड दुरूस्तीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी आधार दुरूस्तीचे केंद्र सुरू झाले होते. परंतु पुन्हा बंद झाल्याचे दिसून येत आहे.
वीज देयक माफ करण्याची मागणी
बुलडाणा : शहरातील गोरगरीब जनतेचे वीजबिल, नगरपालिकेचा सर्व प्रकारचा कर माफ करून त्यांना ३ महिन्याचे राशन देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. अन्यथा आंदाेलनाचा इशारा दिला आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
धामणगाव धाड : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून धाड-करडी रस्त्यावर ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडून विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे.
शिंदी ते मेरा खुर्द रस्त्याची दुरवस्था
साखरखेर्डा : साखरखेर्डा ते मेरा चौकी या १८ किमीच्या रस्त्याची गत काही दिवसापासून दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी माेठमाेठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
चाेरीच्या घटनांमध्ये झाली वाढ
बुलडाणा : परिसरात सध्या दुचाकी लंपास होण्याच्या घटना वाढल्या आहेत. परिसरात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.
अपघात टाळण्यासाठी उपाययाेजना करा
मेहकर : शहरातील रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी वाढलेली असून यामुळे अपघाताचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. या रस्त्यावर अपघात हाेऊ नये यासाठी उपाययाेजना करण्याची मागणी मानव सुरक्षा सेवा संघाच्या वतीने ठाणेदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई
जानेफळ : जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेले निर्बंध व सूचना यांचे व्यापाऱ्यांनी पालन केलेच पाहिजे. ते आपणा सर्वांच्याच हिताचे आहे. परंतु याचे उल्लंघन होताना आढळल्यास व्यापाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करू, असा इशारा ठाणेदार राहुल गोंधे यांनी दिला.
एकाच राॅयल्टीवर वाळूची वाहतूक
महारचिकना: लाेणार तालुक्यात गत काही दिवसापासून वाळूची अवैध वाहतूक हाेत आहे. एकाच राॅयल्टीवर ही वाहतूक हाेत आहे. याकडे महसूल आणि पाेलीस प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे़
काेविड सेंटरवर पाेलीस संरक्षण द्या
देऊळगाव राजा : गेल्या काही दिवसापासून कोविड सेंटरवर नाहक गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे या सेंटरवर पाेलीस बंदाेबस्त ठेवण्याची मागणी डाॅक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे़
वर्षभरात एक काेटीचा गुटखा जप्त
बुलडाणा : राज्य शासनाने गुटखा विक्री व साठवणुकीवर बंदी घातली आहे. तरीही गुटख्याची विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने आवळण्यात येतात. गत वर्षभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी धाडी टाकून अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने जवळपास १ काेटींचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेला गुटखा त्या त्या पाेलीस ठाण्यात ठेवण्यात आला आहे.