बुलडाणा : कोरोना संसर्गामुळे स्थानिक विकासासाठी आमदारांना मिळणाऱ्या तीन कोटी रुपयांच्या निधीपैकी आतापर्यंत दोन कोटी रुपये मिळाले आहेत. यातील एक कोटी रुपये डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात मिळाले आहे. त्यामुळे आता आमदार निधीतून ग्रामीण व शहरी भागातील विकासकामांना चालना मिळणार आहे.
कोरोना संसर्गामुळे प्रारंभी टप्प्याटप्प्याने आमदारांना निधी उपलब्ध केल्या गेला होता. पहिल्या टप्प्यात २० लाख रुपये देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा काही निधी दिला गेला होता. आता पुन्हा एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केल्या गेला आहे.
यावर्षी उपलब्ध झालेल्या निधीतून आमदारांनी कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी मदत व्हावी म्हणून प्राधान्याने आरोग्य विभागास मदत केली होती. त्यानंतर उर्वरित निधीमधून रस्ते, सभामंडप, स्मशानभूमीची कामे व तत्सम कामासाठी निधी दिलेला आहे. आर्थिक वर्ष संपण्यास तीन महिने बाकी असताना हा एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या निधीतून विकासकामांचे नियोजन जिल्ह्यातील आमदारांनी सुरू केले आहे. आयपास प्रणालीवर त्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करण्याचीही कामे सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यावर्षी आमदार निधी टप्प्याटप्प्याने दिला गेला होता. दरम्यान डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक कोटी रुपयांचा आमदार निधी उपलब्ध झालेला आहे. त्यातून विविध विकासकामांचे नियोजन सुरू असल्याचे आ. संजय गायकवाड यांनी ‘लोकमत’ शी बोलताना स्पष्ट केले. आरोग्य क्षेत्रासाठी आपण प्रारंभी प्राप्त निधी दिला होता.
रस्ते विकास आणि पायाभूत सुविधांवर खर्च
रस्ते व पूल बांधणी
आमदार निधीमधून प्रामुख्याने रस्ते, पूल बांधणी तथा पायाभूत नागरी सुविधांची कामे प्राधान्याने केली जातात. सभामंडप व पाणी व नळ योजनांवर खर्च होतो.
आरोग्य क्षेत्रातही निधी
यंदा जिल्ह्यातील आमदारांनी आरोग्य क्षेत्रातही आमदार निधीतून मदत दिली आहे. त्याचा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी चांगला उपयोग झाला.