लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: खरीप हंगामास अवघा एक महिना राहिलेला असताना जिल्ह्यात पीककर्ज वाटपाची गती संथ असून, त्याचा वेग वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत ८,२५० शेतकऱ्यांना ७० कोटी ९४ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. यंदा जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १,३०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले आहे. जिल्हा बँकेची मधल्या काळातील खस्ता हालत पाहता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर जिल्ह्यातील पीककर्जाची प्रामुख्याने मदार आहे. या बँकांना ९०४ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी बँका, ग्रामीण बँक आणि जिल्हा केंद्रीय सहकारी बँक यांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यंदा गेल्यावर्षी एकूण उद्दिष्टाच्या किती टक्के पीककर्ज वाटप केले गेले आहे याच्या आधारावर पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. राज्यस्तरीय बँकर्स समितीनेच यासंदर्भात निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने बुलडाणा जिल्ह्याचे उद्दिष्ट तुलनेने कमी झाले आहे. त्यामुळे दरवर्षी कर्ज घेणाऱ्या १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या दृष्टीने बँकांनी आता पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
जिल्हा बँकेने केले १८ टक्के कर्ज वाटपजिल्हा बँकेनेही गेल्या दोन वर्षांपासून पीककर्ज वाटप सुरू केले असून, यावर्षी जिल्हा बँकेला ६६ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यापैकी २,३२९ शेतकऱ्यांना बँकेने आतापर्यंत १५ कोटी ३९ लाख १२ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. उद्दिष्टाच्या १८ टक्के हे पीककर्ज वाटप करण्यात आले असून, १,३०० शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचे बँकेला उद्दिष्ट देण्यात आले आहे.