बुलडाणा : कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील अैाद्योगिक क्षेत्र पाच वर्षांनी मागे पडले असले तरी वर्तमान स्थितीत ३५० उद्योगांपैकी २४५ उद्योग कार्यान्वीत झाले आहे. मधल्या काळात अत्यावश्यक सेवेत येणारे अर्थात फुड इंडस्ट्रीशी संबंधीत असलेले खामगाव येथील उद्योग वगळता अन्य उद्योग जवळपास बंद होते.मात्र आता जिल्ह्यात ७० टक्के उद्योग सुरू झाले असून जवळपास चार हजारांपेक्षा अधिक कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे. तरीही चिखली अैाद्योगिक वसाहतीतंर्गत कामगारांची समस्या कायम आहे. बुलडाणा जिल्ह्यात एकूण ४८२ उद्योग असले तरी त्यापैकी ११५ उद्योग पुर्वीपासूनच बंद आहेत तर अन्य काही उद्योग डबघाईस आले आहेत. अशा स्थितीत लॉकडाऊन पूर्वी जिल्ह्यात ३५० उद्योग सुरू होते. मात्र मार्चमध्ये लाॅकडाऊन सुरू झाल्यानंतर खामगावातील कृषी उद्योग व फुड इंडस्ट्रीजशी संबंधीत उद्योग सुरू होते. २० एप्रिल नंतर खऱ्या अर्थाने ते सुरू झाले. या कालावधीत जिल्ह्यात ९७ उद्योग सुरू होते. त्यात १,१२५ कामगार कार्यरत होते. त्यानंतर टप्प्या टप्प्याने उद्योग जिल्ह्यात सुरू झाले. या प्रामुख्याने दालमील, तेल उत्पादन, जिनिंग उद्योगांचा समावेश होता. मात्र मलकापूर येथे असलेल्या रसायन उद्योग, पेपर मिल, बोर्ड उद्योग, ऑईल मिल व्यवसायाला फटका बसला आहे. जिल्ह्यात नऊ अैाद्योगिक वसाहती आहेत. मात्र मलकापूर, खामगाव व काही प्रमाणात चिखली येथेच खऱ्या अर्थाने उद्योग एकवटलेले आहे.
कामगारांची समस्या कायम आहे. पण स्थिती पूर्वपदावर येतेय. २५ टक्के उद्योग सुरू झाले असून २० टक्क्यांच्या आसपास कामगार आले येथे आले आहेत.- अशोक अग्रवाल, उद्योजक, चिखली.
खाद्य उद्योग व अत्यावश्यक सेवेत येथील उद्योग अधिक आहेत. त्यामुळे लॉकडाऊन काळात येथे उद्योग सुरू होते. मात्र उद्योगाल फटका बसला.- मोहनलाल तावरी, उद्योजक, खामगाव