कोबी पिकाचे नुकसान
मेहकर : तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर शेतीमध्ये पत्ता कोबी या भाजीपाला पिकाची लागवड केली होती. पीक चांगले बहरले होते. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. ऐन पीक विक्री करणाच्या काळात भाजी बाजारपेठा बंद असल्यामुळे कोबी पिकाचे नुकसान होत आहे.
पानमळ्यांना विम्याचे कवच देण्याची मागणी
धाड : लॉकडाऊनमुळे पानमळा व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. परिसरात अनेक पानमळे आहेत. शासनाने पानमळ्यांना विम्याचे कवच द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नियम पाळण्याची गरज
देऊळगाव मही : लॉकडाऊनच्या नियमांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. फिजिकल डिस्टसिंग पाळणे, मास्क वापरणे, साबणाने हात धुणे गरजेचे आहे. परंतु काही नागरिक विनाकारण रस्त्यावर गर्दी करीत आहेत. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे.
डासांचे प्रमाण वाढले
हिवरा आश्रम : सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. नागरिक लॉकडाऊन नियमांचे पालन करीत आहेत. मात्र गावात डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गावात दैनंदिन स्वच्छतेची कामे केली जात असली, तरी सध्या डासांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. ज्या भागात नाल्या नाहीत, त्या भागातही डासांचे प्रमाण वाढले आहे.
सौर कृषी पंपाची प्रतीक्षा
डोणगाव : मोठा गाजावाजा करून शेतकऱ्यांसाठी शासनाने सौर कृषीपंप योजना आणली. परंतु यातील लाभार्थ्यांना पैसे भरून वीजजोडणी देण्यात आली नाही. अनेक शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची प्रतीक्षा आहे. आजपर्यंत त्यांना वीजजोडणी मिळालेली नाही.
शेळीपालन योजनेच्या अनुदानापासून लाभार्थी वंचित
बुलडाणा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागातील भूमिहीन बेरोजगारांनी शेळी पालनासाठी शेळ्या खरेदी करून अनेक महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र अजूनही त्यांना शासनाकडून अर्थसहाय्य मिळाले नसल्याने लाभार्थी कर्जबाजारी झाले आहेत.
घरपोच खत सुविधा देण्याची मागणी
देऊळगाव राजा : लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी कृषी विभागाने बचत गटांमार्फत शेतकऱ्यांना घरपोच खत पोहोचविण्याची सुविधा सुरू करणे आवश्यक आहे. मागीलवर्षी अशी सुविधा राबिवण्यात आली होती.
पीक कर्ज वाटप संथगतीने
बुलडाणा : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. परंतु पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. परिणामी जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाची गती वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
म्युकरमायकोसिसची भीती
बुलडाणा : कोरोनाबरोबरच आता म्युकरमायकोसिसचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. परंतु ज्या गावात रुग्ण नाहीत, अशा ठिकाणचेही रुग्ण सापडल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण होत आहे.