लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पीएम केअर फंडातून बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना ७५ व्हेंटिलेटर्स उपलब्ध झाले असून यापैकी ६६ व्हेंटिलेटर्स सध्या सुरू असल्याची माहिती पाहणीत समोर आली आहे. दरम्यान, ९ व्हेंटिलेटर्स अद्यापही बंद असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. व्हेंटिलेटर्स असलेल्या बेडचीही मागणी वाढत आहे. त्यासाठी रुग्णाला घेऊन नातेवाईकांची जिल्ह्यात धावपळ सुरू सुरू आहे. मात्र व्हेंटिलेटर्स उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचाही जीव टांगणीला लागल्याचे एकंदरीत चित्र जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. गेल्या वर्षी पीएम केअर फंडातून बुलडाणा जिल्ह्याला ७५ व्हेंटिलेटर्स उपलब्ध झाले होते. यापैकी ६६ व्हेंटिलेटर्स सध्या कार्यान्वित करण्यात आले आहे. मात्र ९ व्हेंटीलेटर्स अद्यापही कार्यान्वित झालेेले नाहीत. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांना विचारणा केला असता काही तांत्रिक अडचणीमुळे ९ व्हेंटिलेटर्स कार्यान्वित करता आले नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र लवकरच त्यादृष्टीने आरोग्य विभाग प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. सोबतच तालुकानिहाय आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्याचे प्रयत्न सुरू असून त्याअंतर्गत तालुकानिहाय यासंदर्भात काही सुविधा उपलब्ध करता येतील का, याचीही चाचपणी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. बुलडाणा जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातही ५९ व्हेंटिलेटर्स उपलब्ध असून ते कार्यान्वित असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली. दुसरीकडे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये पीएम केअर, जिल्हा वार्षिक योजना आणि अन्य स्रोतांकडून उपलब्ध झालेल्या व्हेंटिलेटर्सची संख्या ही ९३ असून त्यापैकी प्रत्यक्षात ७८ व्हेंटिलेटर्स सध्या कार्यान्वित असल्याचे सूत्रांनी सांगितले. देऊळगावराजा येथील ट्राॅमा केअर सेंटरमध्येही जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध झालेले दोन व्हेंटिलेटर्स सध्या कार्यान्वित आहेत.
पीएम केअर फंडातून बुलडाणा जिल्ह्याला ७५ व्हेंटिलेटर्स, ९ बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 11:02 AM