लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : तालुक्यातील तरवाडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पोटा या ७०० लोकसंख्या असलेल्या गावात १५० नागरिकांची कोरोना चाचणी केली असता, त्यापैकी ७८ कोरोना बाधित निघाल्याने प्रशासनाने अख्खे गावच कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहे. गावातील एका अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या १५० ग्रामस्थांची कोरोना चाचणी केली असता, त्यापैकी ७८ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील पोटा या गावात यापूर्वी १६ रुग्ण कोरोनाचे आढळले होते, तर एक मृत्यूही झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या गावात जाऊन गावातील नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या असता १५० पैकी ७८ कोरोना बाधित आढळल्याने व गावात एकूण ९४ कोरोनाची रुग्णसंख्या झाल्याने अख्खे गावच कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहे. आडवळणाच्या या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने आरोग्य विभाग व प्रशासनाने या गावात कॅम्प लावून लोकांना आरोग्य सुविधा पुरविणे गरजेचे झाले आहे.