मेहकर : सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असून, शहरामध्ये व ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत आहे. तर मेहकर शहराला गेल्या काही दिवसापासून आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने पाण्यासाठी महिलांची पायपिट सुरु आहे. सध्या कडक उन्हाळा सुरु झाला आहे. कडक उन्हामुळे सर्वसामान्य जनता परेशान झाली आहे. तर मेहकर शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून ७ ते ८ व्या दिवशी नळ सोडण्यात येत असल्याने तुरळक प्रमाणात शहरात पाणीटंचाई जाणवत आहे. मेहकर शहराला कोराडी प्रकल्प व अनिकट या ठिकाणावरुन पाणी उपलब्ध करुन देण्यात येते. तर अनिकटावर असलेल्या विहिरीची पाण्याची पातळी खालावली असल्याने पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. तसेच शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास ७० हातपंप आहेत. या मधील ३५ हातपंप बंद अवस्थेत पडले आहेत. तसेच जे काही उर्वरीत हातपंप आहेत त्या हातपंपाची पाण्याची पातळी सुद्धा कमी अधिक प्रमाणात होत असल्याने पाणीटंचाईवर याचा परिणाम होत आहे. शहराला वेळेवर पाणी पुरवठा व्हावा, महिलांना पाण्याचा त्रास होऊ नये, यासाठी नगर पालीकेच्यावतीने आनिकटवरील असलेल्या विहिरीमध्ये आडवे व उभे बोअर घेणे, गाळ उपसणे आदी कामे युद्ध पातळीवर सुरु आहेत. तसेच शहरामध्ये २० सबमर्शिबल पंप असून, यामधील ४ पंप गेल्या अनेक दिवसापासून बंद अवस्थेत आहेत. तर सदर पंप सुरु करण्याचे काम न.पा.च्यावतीने सुरु आहे. शहरामध्ये पाणीटंचाई निर्माण होऊ नये, शहरवासियांना मुबलक व वेळेवर पाणी मिळावे, यासाठी नगर पालीकेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.-----------------------शहरवासियांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अनिकटवरील विहिरीची पाण्याची पातळी कमी झाल्याने विहिरीमध्ये आडवे व उभे बोअर घेणे सुरु आहे. पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येईल.- कासम गवळी, नगराध्यक्ष, न.प.मेहकर.----------------------३ ते ४ थ्या दिवशी शहरवासियांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. ज्याठिकाणावरुन शहराला पाणी पुरवठा होतो त्या ठिकाणची पाण्याची पातळी खालावली असून, लवकरच उपाय योजना करुन सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल.- ओमप्रकाश सौभागे, पाणीपुरवठा सभापती, न.प.मेहकर.----------------------पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी विजेच्या अडचणी येत होत्या. तर आता ह्या अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरु असून, लवकरच वेळेवर पाणी पुरवठा करण्यात येईल.- अशोक सातपुते, मुख्याधिकारी, न.प.मेहकर.
आठ दिवसांआड पाणीपुरवठा
By admin | Published: April 04, 2017 12:42 AM