खामगाव : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अनियंत्रित कार बसवर आदळून झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजतादरम्यान खामगाव- शेगाव रस्त्यावरील एका महाविद्यालयासमोर घडली. यात दोन पोलिस, एसटी चालक आणि पाच प्रवासी अशा नऊ जणांचा समावेश आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, खामगाव बसस्थानकातून एमएच ४० एन ८२७६ क्रमांकाची बस शेगावमार्गे दर्यापूर येथे जात होती. दरम्यान, त्याचवेळी विरुद्ध दिशेने म्हणजेच शेगाव येथून एक कार येत होती. खामगाव शेगाव रोडवरील जयपूर लांडे फाट्याजवळील एका महाविद्यालयानजीक अनियंत्रित कार बसवर आदळून झालेल्या अपघातात कारमधील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह चालक असलेला पोलिस कर्मचारीही गंभीर जखमी झाला. तर एसटी बसमधील चालकासह सात प्रवासी जखमी झाले. कारमधील जखमींना तत्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.
कारमधील दोन्ही पोलिसांना प्रत्यक्षदर्शींनी बाहेर काढून तत्काळ सामान्य रुग्णालयात हलविले. यात अरविंद भाऊलाल बडगे (४०) यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. तर गंभीर जखमी असलेल्या सुनीता खराटे (३०) रा. शिवाजी नगर खामगाव यांना खामगाव येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. याप्रकरणी एसटी चालकाच्या तक्रारीवरून शहर पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
या घटनेची माहिती मिळताच, शहर आणि शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. महिला पोलिस कर्मचारी शेगाव येथून ड्युटीसाठी खामगावात येत असल्याचे समजते. तर अरविंद बडगे हे शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. काही कामानिमित्त ते शेगाव येथे गेल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
एसटीतील जखमी
- संजय फिरपवार रा. चांदूरबाजार (एसटी चालक)
- दीप्ती नामदेव चांदूरकर (१४) रा. कुटासा
- लता प्रकाश वानखडे (६५) रा. वडनेर ता. अकोट
- आदित्या नामदेव चांदूरकर (११) रा. कुटासा
- रूपाली सागर शेलकर (२५) रा. अंजनगाव
- आराध्या सागर शेलकर (०५) रा. अंजनगाव