सुलतानपूर येथे २०१४ मध्ये ही घटना घडली होती. सुलतानपूर येथील जामा मशीदच्या अध्यक्षपदावरुन वाद झाला होता. त्यावेळी आरोपी शे. दस्तगीर शे. उमर, शे. ख्वाजा शे. उमर, शे. हनीफ शे. उमर, शे. आमीर शे. उमर, शे. उमर शे दादामिया, शे. हमीद शे. उमर, शे. मोहसीन शे. असद, जाकीर खा शौकत खा पठाण यांनी २४ जानेवारी २०१४ रोजी दुपारी संबंधित धार्मिक स्थळाच्या प्रांगणामध्ये शे. नासिर शे. गणी, शे. इर्शाद शे. रेहमान, शे. फिरोज शे. रेहमान, शे. सोहेल शे. इरफान यांना जबर मारहाण केली होती.याप्रकरणी सुलतानपूर पोलीस चौकीत तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या हाणामारीत इर्शाद आणि शेख फिरोज हे गंभीर जखमी झाले होते. शे. नासिरने दिलेल्या फिर्यादी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकृष्ण पवार यांनी तपास करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. लोणार न्यायालयात प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून लोणार न्यायालायने उपरोक्त आरोपींना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी ५,५०० रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद अशी तरतूद, या निकालात करण्यात आली आहे. या प्रकरणात वादी पक्षातर्फे सरकारी वकील वैशाली कस्तुरे यांनी काम पाहिले. त्यांना पोलीस कॉन्स्टेबल कायंदे, धोंडगे आणि इंगले यांनी सहकार्य केले.
मारहाणप्रकरणी ८ जणांना दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:34 AM