बुलढाणा: गेल्या रविवारी लघुशंकेस गेलेल्या देव्हारी येथील महिलेवर बिबट्याने प्राणघात हल्ला करीत गंभीर जखमी केल्याच्या घटनेची वन्यजीव विभागाने गंभीर दखल घेतली आहे. गाव परिसरात वन्यजीव विभागाने ८ ट्रॅप कॅमेरे लावले असून दिवसरात्र गस्त सुरू केली आहे.
दुसरीकडे बिबट्ट्याच्या हल्ल्यानंतर या गावात दहशतीचे वातावरण असून यापूर्वीही बिबट्याने गावातील दोन मेंढ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारले होते. गेल्या तीन वर्षापूर्वी टी१सी१ वाघ ज्या ज्ञानगंगा अभयारण्यात काही काळ स्थिरावला होता. त्याच अभयारण्यात देव्हारी हे गाव वसलेले आहे. गावालगत घनदाट जंगल असल्याने मोठ्या प्रमाणावर गाव लगत वन्यप्राण्यांचा अधिवास आहे.
मागील आठवड्यात या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात दोन मेंढ्या ठार झाल्या होत्या तर गावानजीकच लघुशंकेस गेलेल्या निकिता सागर गवई (२५) या महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला गंभीररित्या जखमी केले होते. गावाजवळच बिबट्याच्या हल्ल्याच्या दोन घटना घडल्याच्या पार्श्वभमीवर गावातील नागरिकांमध्ये सध्या दहशत आहे.
दुसरीकडे खबरदारी म्हणून वन्यजीव विभागाच्यावतीने गावालगत ८ ट्रॅप कॅमेरे आता लावले असून गाव परिसरातील वर्तुळात रात्रंदिवस दोन पथक सध्या गस्त घालत आहे. एका पथकामध्ये सात कर्मचारी तैणात करण्यात आले असल्याची माहिती आरएफअेा चेतन राठोड यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी दिली गावास भेट
ज्ञानगंगा अभयारण्यात वसलेल्या देव्हारी गावात बिबट्याची दहशत असल्याच्या पार्श्वभमीवर बिबट्या प्रसंगी पुन्हा गावात हल्ला करण्याची शक्यता पहाता विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) अनिल निमजे, आरएफअेा चेतन राठोड यांनी गावाला भेट देऊन पहाणी केली. सोबतच महिलेवर ज्या ठिकाणी हल्ला झाला होता त्या ठिकाणाचा पंचनामाही करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी गावाच्या पुनर्वसनाचा मुद्दा पुन्हा नव्याने रेटला आहे.