लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हय़ातील ४३ ग्रामपंचायतींमधील सरपंच आणि सदस्य निवडीसाठी २६ डिसेंबर रोजी जिल्हय़ात शांततेत मतदान झाले. दरम्यान, १७३ सरपंच पदांसाठीचे आणि ७६६ सदस्य पदांसाठीच्या उमेदवारांचे भवितव्य २७ डिसेंबरला प्रत्यक्ष मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. दरम्यान, या निवडणुकीत ८१ टक्के मतदान झाले असून, ६९ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हय़ातील १३ पैकी ११ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या या निवडणुका होत असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता प्रत्यक्षात मतदानास सुरुवात झाली. प्रारंभी संथगतीने असणारे हे मतदान दुपारी उन्हाचा पारा चढत असताना वाढले. दुपारी दीडपर्यंत ४३.४९ टक्के मतदान झाले होते. यामध्ये १९ हजार २६९ महिलांनी तर १८ हजार १७0 पुरुष अशा ३७ हजार ४३९ जणांनी मतदान केले. दरम्यान, सायंकाळी साडेपाच वाजता मतदान प्रक्रिया थांबली तोवर जिल्हय़ात सरासरी ८१ टक्के मतदान झाले होते. ४३ ग्रामपंचायतींमधील ८६ हजार ९४९ मतदारांपैकी ६९ हजार ५६0 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी ७७.४0 टक्के, चिखली तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींसाठी ७९.७५, लोणार तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी ८२.५४, मेहकरमधील ग्रामपंचायतींसाठी ८२.१६, सिंदखेड राजामधील ६ ग्रामपंचायतींसाठी ७७, देऊळगाव राजा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी ८८.३९, खामगावमधील चार ग्रामपंचायतींसाठी ८६.१३, शेगावमधील दोन साठी ८४.९८, जळगाव जामोदमधील दोनसाठी ७४.५६, मलकापूरमधील एका ग्रामपंचायतीसाठी ७८.३३ आणि मोताळा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींसाठी ७९.८८ असे एकूण ४१ ग्रामपंचायतींसाठी ८१.0१ टक्के मतदान झाले. दोन ठिकाणी तांत्रिक अडचण असल्याने तेथील आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. या मतदान प्रक्रियेसाठी ८५0 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ४३ ग्रामपंचायतींमधील १४४ प्रभागामध्ये ही निवडणूक होत असून, १५२ मतदान केंद्रे यासाठी ठेवण्यात आली होती.
१६ जागा रिक्त४३ ग्रामपंचायतींच्या या दुसर्या टप्प्यातील निवडणुका जरी असल्या तरी यातील १६ जागा या रिक्त राहिल्या आहेत. संबंधित जागेसाठी नामांकन अर्जच आलेले नाहीत. त्यामुळे तेथे आगामी काळात पोटनिवडणुका घेतल्या जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले, तर ९५ जागा या अविरोध झाल्या आहे. २७ डिसेंबरला प्रत्यक्षात मतमोजणी झाल्यानंतर याबाबतची तांत्रिकदृष्ट्या घोषणा केली जाईल. दुसरीकडे जळगाव जामोद तालुक्यातील कुंबरदेव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठीच उमेदवार नसल्याने येथेही या पदासाठी निवडणूक घेता आलेली नाही. परिणामी तेथेही भविष्यात संबंधित जागेसाठी पोटनिवडणूक घ्यावी लागणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.