साखरखेर्डा : प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत आतापर्यंत ८१० जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. या रुग्णांना खासगीपेक्षा प्राथमिक आराेग्य केंद्राचाच माेठा आधार मिळाल्याचे चित्र साखरखेर्डा परिसरात आहे.
साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि पाच उपकेंद्रात आरटीपीसीआरच्या २ हजार ९९४ आणि रॅपिडच्या ३ हजार ५७९ तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी ८१० जण कोरोना पाॅझिटिव्ह निघाले. कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर ज्याच्या जवळ पैसा आहे, अशा रुग्णांनी प्रथम स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले. केस क्रिटिकल होताच स्थानिक डाॅक्टरांनी चिखली, बुलडाणा, मेहकर, जालना आणि औरंगाबाद शहरात रुग्णांना हलविण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला. खरेतर कोरोनावर निदान कसे करायचे, याचे ज्ञान नसताना केवळ पैशांच्या लोभापायी रुग्णांना झुलवत ठेवून त्यांना काय साध्य करायचे होते, हा आता संशोधनाचा विषय ठरत आहे. या उपचारादरम्यान अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे साखरखेर्डा आणि परिसरातील गावे कोरोना हाॅटस्पाॅट ठरली होती. या कोरोना काळात कोरोना चाचणी घेणारे डॉ. गजानन चव्हाण पाॅझिटिव्ह रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्या, घरीच क्वारंटाईन रहा, असा सल्ला डॉ. संदीप सुरुशे आणि डॉ. प्रियंका अग्रवाल देत हाेते. हाेम क्वारंटाईन केलेल्या सर्व रुग्णांची तपासणी येथील आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका करत असत. रुग्णांची सेवा करता करता प्राथमिक आरोग्य केंद्राचे काही कर्मचारी पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यांनी धीर सोडला नाही. जी औषधे रुग्णांना दिली, तीच औषधे त्यांनी घेतली आणि स्वतः कोरोनामुक्त झाले. रुग्णांनाही कोरोनामुक्त केले. ८१०पैकी किमान ३००हून अधिक रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधांवर बरे झाले. साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राची ओपीडी ही ३५० ते ४०० पर्यंत आहे. प्रत्येक गावात जाऊन डॉ. प्रवीण ठोसरे, डॉ. रिंढे, डॉ. वायाळ यांच्यासह आरोग्यसेवक बी. टी. गिऱ्हे, जी. ए. भोंडे यांनी कॅम्प घेऊन कोरोना चाचणी घेतली. त्यामुळेच ग्रामीण भागातील रुग्ण संख्या झपाट्याने कमी झाल्याचे पाहावयास मिळते.
लसीकरणाचीही गती वाढली
साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात २ हजार ८३८ व्यक्तिंना कोविशिल्डचा पहिला डोस, तर १०८० व्यक्तिंना दुसरा डोस देण्यात आला. १९२ व्यक्तिंना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला.
कोरोनाला हरवायचे असेल तर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. होमक्वारंटाईन राहून नियमित औषध घेणे गरजेचे आहे. ते नियम पाळल्यानेच रिकव्हरी झाली.
डॉ. संदीप सुरुशे
वैद्यकीय अधिकारी
माझा सीआरपी प्रथम ४२ होता. माझे वय ८० वर्षांचे आहे. नियमित तपासणी आणि हिंमत खचू न देता प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दिलेले औषध घेतल्याने सीआरपी फक्त दोन आहे. माझी तब्येत ठणठणीत आहे.
भीमराव इंगळे,
अध्यक्ष, शिवाजी व्यायाम शाळा, साखरखेर्डा