ऑनलाइन लोकमत/ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा, दि. 13- जिल्ह्यात मराठी व उर्दु माध्यमाच्या एकूण ८३ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा मुख्याध्यापकाविना सुरू आहेत. त्या ८३ शाळेतील मुख्याध्यापकांचा कारभार इतर शिक्षकांवर देण्यात आला असून, मंजूर शिक्षकांपैकी ६.३० टक्के शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षकांबरोबरच मुख्याध्यापकांअभावी प्रशासकीय कामावरही परिणाम जाणवत आहे.
राज्यात लाखो डी.टी.एड् व बी.एड्. धारक रोजगाराच्या शोधात फिरत आहेत. तर दुसरीकडे अतिरिक्त शिक्षक असल्याच्या नावाखाली गेल्या सहा वर्षापासून शिक्षकांची पदभरती झाली नाही. त्यामुळे डी.टी.एड् व बी.एड्. पदवी घेऊन बाहेर पडणा-या सुशिक्षीत बेरोजगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.
शिक्षण क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात सर्व शिक्षा अभियानाकडून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. मात्र, शिक्षकांचे रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे.जिल्ह्यात एकूण २ हजार ३३२ शाळा आहेत. त्यामध्ये १ हजार ४४८ जिल्हा परिषद, १०७ नगर पालिका व ७७७ खाजगी शाळांचा समावेश आहे. यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक मराठी माध्यमांच्या शाळेवर मुख्याध्यापकांसह ६ हजार १८६ पदे मंजूर आहेत. परंतू त्यातील ६ हजार ५६७ पदे कार्यरत असून ३९० पदे रिक्त आहेत. त्यामध्ये मुख्याध्यापकांची ३८९ पदे मंजुर आहेत. परंतू ३२४ मुख्यध्यापक कार्यरत असून ६५ मुख्यध्यापकांची पदे रिक्त आहेत.
उच्च प्राथमिक शिक्षकांची पदे १ हजार २९२ मंजूर असून १ हजार २०४ कार्यरत आहेत. तर ८७ रिक्त आहेत. प्राथमिक शिक्षकांची ४ हजार ५१२ पदे मंजूर असून, ४ हजार २७४ कार्यरत व २३८ रिक्त आहेत. जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या शाळांवरील ६५ व उर्दु माध्यमांच्या शाळावरील १८ असे एकूण ८३ पदे रिक्त असल्याने त्या शाळेवरिल मुख्याध्यापकांचा कार्यभार इतर शिक्षकांवर सोपवण्यात आला आहे. शिक्षकांबरोबरच मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्याने शाळांच्या प्रशासकीय कामांना खीळ बसत आहे.
रिक्तपदांचा प्रश्न कायम
अतिरिक्त शिक्षक असतानाही रिक्त पदे कायम राज्यातील सर्व खासगी माध्यमिक शाळांची २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन संच मान्यता पूर्ण करण्यात आली होती. त्यानुसार राज्यात चार हजार ५३ शिक्षक अतिरिक्त दाखविण्यात आले होते. एकीकडे चार हजार ५३ शिक्षक अतिरिक्त झाले असले तरी वेगवेगळ्या जिल्ह्यात चार हजार ५७७ माध्यमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. राज्यात अतिरिक्त शिक्षक असतानाही रिक्त पदांचा प्रश्न मात्र, कायम आहे.
उर्दु माध्यमाचे १०८ पदे रिक्त प्राथमिक व उच्च प्राथमिक उर्दु माध्यमांच्या शाळेवर मुख्याध्यापकांसह ७६९ पदे मंजूर आहेत. परंतू त्यातील ७३९ पदे कार्यरत असून १०८ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये मुख्यध्यापकांची ४७ पदे मंजुर आहेत. परंतू २९ मुख्यध्यापक कार्यरत असून १८ मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. उर्दु उच्च प्राथमिक शिक्षकांची पदे २०४ मंजूर असून १७५ कार्यरत आहेत. तर २९ रिक्त आहेत. प्राथमिक शिक्षकांची ५१८ पदे मंजूर असून ४५७ कार्यरत व ६१ रिक्त आहेत.