खामगाव: बँक खात्याची व क्रेडीट खात्याची मुदत वाढवून देण्याच्या बहाण्याने एका युवकाची ८३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. युवकाशी मोबाईलवरून संपर्क साधत त्यांच्या भारतीय स्टेट बँकेच्या खात्यातून ठराविक वेळेत परस्पर रक्कम काढण्यात आली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीसात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
टिळक राष्ट्रीय विद्यालयानजीक असलेल्या शौकत कॉलनीतील मोहमद फैसल मो. अनिस (२७, धंदा: मजुरी) या युवकाने शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, त्याचे भारतीय स्टेट बँकेत खाते आहे. या खात्याची तसेच क्रेडीट कार्डाची मुदत वाढवून देण्यासाठी त्याला अनोळखी इसमाचा फोन आला. बँक अधिकारी बोलतो, असे सांगत त्याने बँकेतील खात्याची आणि क्रेडिट कार्डची माहिती मिळविली.
तसेच ओटीपी मिळवून खात्यातील ८३ हजाराची रक्कम परस्पर काढून घेतली. या प्रकरणी फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याने शिवाजी नगर पोलीसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलीसांनी अज्ञात आरोपी विरोधात भादंवि कलम ४१५, ४२० सहकलम ६६(सी), ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे निरिक्षक अरुण परदेशी करीत आहेत.