लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : हरवलेल्या, वाट चुकलेल्या, भीक मागून उदरनिर्वाह करणार्या बालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून १ जुलैपासून ‘ऑपरेशन मुस्कान’ हाती घेण्यात आले होते. महिनाभर राबविण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये जिल्हाभरातून ८४७ बालकांचा शोध लावून त्यांना त्यांचे आई-वडील, कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याने वाट चुकलेल्या या बालकांना जगण्याचा नवा मार्ग मिळाला. वाट चुकलेले, भीक मागून उदरनिर्वाह करणारे, बालकामगार अशा मुलांचा शोध घेण्यासाठी केंद्र शासनाने विशेष मोहीम उघडली आहे. गेल्या तीन वर्षापासून ‘ऑपरेशन मुस्कान’ या नावाने पोलिस स्टेशन व विशेष पथकाकडून ही मोहीम राबविली जाते. अल्पवयीन मुले हरवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हरवलेल्या मुलांना सुखरूप शोधणे व आई-वडिलांच्या ताब्यात देणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे बेपत्ता मुलांना शोधणे आणि त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य ‘ऑपरेशन मुस्कान’ या मोहीमेच्या माध्यमातून पार पाडले जात आहे. १ ते ३0 ऑगस्ट २0१५ मध्ये सुरूवातीला मुस्कान मोहिम हाती घेण्यात आली होती. त्यामध्ये २३८ बालकांचा शोध लागला होता. त्यानंतर २0१६ या वर्षामध्ये जानेवारी, एप्रिल व जून महिन्यात पुन्हा ऑपरेशन मुस्कान राबविण्यात आले असता जानेवारीमध्ये ४५४, एप्रिलमध्ये १११ व जून मध्ये ४0४ बालकांचा शोध लागला. एका वर्षानंतर पुन्हा १ ते ३१ जुलै या कालावधीमध्ये ऑपरेशन मुस्कान हाती घेण्यात आले. या मोहिमेदरम्यान विविध संस्था, सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल, दुकाने, धार्मिक स्थळे, आश्रम, रेल्वेस्थानक, बसस्थानक आदी ठिकाणची व भीक मागणार्या मुलांची चौकशी करण्यात आली. जिल्ह्यात महिनाभर राबविण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कानमुळे वाट चुकलेल्या, भीक मागून उदरनिर्वाह करत असलेल्या ८४७ बालकांचा शोध लावण्यात पोलिसांना यश मिळाले. यामध्ये ४५८ मुले व ३८९ मुलींचा समावेश आहे. हरवलेल्या या बालकांना त्यांचे आई-वडील, कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी राबविली मोहीमजिल्ह्यात १ ते ३१ जुलै या कालावधीत ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहीम राबविण्यात आली. या पथकामध्ये जिल्हा पोलिस अधिक्षक शशीकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली, एएसपी संदीप डोईफोडे, एल.सी.बी. पीआय प्रतापसिंग शिखारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पी.एस.इंडोळे, जिल्हा पथक प्रमुख तथा जिल्हा बालसंरक्षण अधिकारी शहानवाज खान, पोउनी शेषराव अंभोरे, गजानन चतूर, विलास काकड, अविनाश जाधव, कल्पना हिवाळे व चालक पोहकॉ विजय उभाळे यांचा समावेश होता. तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन अंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली.