लोणार : येथील कोविड केअर सेंटरवर अत्यवस्थ अवस्थेत दाखल केलेल्या ८५ वर्षीय कोरोनाग्रस्त वृध्दाचा १६ एप्रिल राेजी मृत्यू झाला. मध्यरात्री श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला. परंतु, प्रतिसाद न मिळाल्याने मृत्यू झाला़ या वृद्धाचा मुलगाही पाॅझिटिव्ह असल्याने नगरपालिका प्रशासनाने या मृतकावर अंत्यसंस्कार केले़
लाेणार तालुक्यातील गायखेड येथील रहिवासी असणाऱ्या या ८५ वर्षीय वृध्दाला श्वास घेण्यास त्रास हाेत असल्याने रुग्णालयात दाखल केले हाेते़ त्यांना ऑक्सिजन लावले हाेते़ परंतु, प्रतिसाद न दिल्याने पहाटे त्यांचा मृत्यू झाला़ त्यांचा एक मुलगा (वय ४५) सुध्दा अत्यवस्थ असल्याने त्याला अन्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जवळचे कुणीही नातेवाईक हजर नसल्याने काही आप्तेष्टांच्या उपस्थितीत लोणार नगर परिषदेच्या वतीने स्थानिक स्मशानभूमीत या वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यात आले . सकाळीच नगरपरिषद मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांना माहिती मिळताच नायब तहसीलदार हेमंत पाटील ,वैद्यकीय अधीक्षक फिरोजशाह ,कोविड सेंटर व्यवस्थापक डॉ. भास्कर मापारी ,गायखेडचे माजी सरपंच शालिक घायाळ यांनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेत अंत्यविधी पार पाडले़
यावेळी कोविड सेंटचे ब्रदर सचिन मापारी , स्वप्निल शिंदे , पाटोळे , सुधाकर सरकटे नगर परिषदचे फुलचंद व्यास , निचंग यांच्या मार्गदर्शनात आकाश डागर यांनी मृतदेहाचे निर्जंतुकीकरण करून पॅकिंग केले़ या रुग्णाचे दोन्ही मुले अनुपस्थित असल्याने जावयाच्या उपस्थितीत प्रशासनाने माणुसकी दर्शवित बौद्ध रितीरिवाजाप्रमाणे अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडले़ गेल्या २ दिवसांतील हा तालुक्यातील अधिकृत कोरोना बळी गेल्यामुळे तालुक्यात आता कोरोना मृत्यूचे तांडव सुरू होते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.