बुलडाणा - शहरातील सेंट जोसेफ या शाळेत आठव्या वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्यांस परीक्षेत कमी गुण मिळाल्याने त्याच्या आईने त्यास चक्क सराटा गरम करून पाठीवर चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरून त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 2 ऑगस्ट रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. शाळेमध्ये झालेल्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाले. मात्र, आई-वडिलांना जास्त गुण मिळाल्याचे मुलाने खोटे सांगितले. गुण कमी मिळाल्याचे कळाल्यानंतर तक्रारदार विद्यार्थ्याच्या आईने सराटा गरम करुन मुलाच्या पाठीवर चटके दिले. एवढेच नव्हे तर 30 जुलैला झालेल्या पालकसभेनंतर घरी पोहोचल्यावर आईने घराबाहेर काढल्याचा उल्लेख देखील मुलाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरुन त्याच्या आईविरुद्ध बाल संरक्षण अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलाला घराबाहेर काढल्यानंतर तक्रारदार विद्यार्थ्याने घडलेली हकीकत आधी मित्राच्या आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर हे प्रकरण बालकल्याण समितीकडे गेले. बालकल्याण समितीने त्या विद्यार्थ्यांवर उपचार करुन त्यास समितीच्या वसतिगृहात ठेवले आहे.
8 वीतील मुलाची पोलीस तक्रार, चटके देणाऱ्या आईविरुद्ध गु्न्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2022 3:30 PM