बुलडाणा, दि. 0१- दैत्यशक्तीचा पराभव करून देवाचं देवपण कायम ठेवणार्या जगन्मातेच्या नवरात्रोत्सवाची जिल्हाभरात उत्साहात सुरुवात झाली आहे. जिल्हाभरात प्रत्येक गावांमध्ये सार्वजनिक दुर्गोत्सव साजरा होतो. पर्यावरण तसेच आरोग्यविषयक प्रबोधन करणारी दृश्ये, आकर्षक रोषणाई, स्वागत-द्वार व दिव्यांच्या प्रकाशात देवीच्या मंडपाचा परिसर न्हावून निघतो. मंदिरासह अन्य देवस्थानांतही मंगळवारी घटस्थापनेने दुर्गोत्सवास प्रारंभ झाला असून, सर्वत्र भक्तीमय वातावरणात नवरात्रोत्सव साजरा होत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त विविध मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, जिल्ह्यात ९५६ मंडळात घटस्थापना करण्यात आली आहे. यात ग्रामीण भागात ६१0 मंडळ आणि शहरी भागात ३४६ मंडळ दुर्गोत्सवात साजरा करणार आहेत. यावर्षी येणार्या अकरा दिवसात घेण्यात येणार्या विविध कार्यक्रमांबाबत सर्वांनी नियोजन केले आहे. शहरात गेल्या २0 ते ३0 वर्षांपासून अनेक नवरात्र उत्सव मंडळं कार्यरत असून, प्रत्येक मंडळाकडून सामाजिक बांधीलकी राखली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या कालावधीत सार्वजनिक दुर्गा मंडळांकडून विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविले जात असतात. शहरात नवरात्रोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा होतो. रस्त्यांवर भक्तांची मोठी वर्दळ असते. सध्या सराफ गल्ली, बाजार चौक, कारंजा चौक, स्टेट बँक चौक, संभाजीनगर, चिखली रोड, मलकापूर रोड, जुना गाव, सुंदरखेड, महाराणा प्रताप चौक या ठिकाणी नवरात्र उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मंडळाचे कार्यकर्ते प्रत्येक दिवसाचे नियोजन करीत असून, शहरातील विविध मार्गांवर रोशणाई व सजावटीचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय पूजापाठाचे साहित्य खरेदीसाठी मंडळांचे कार्यकर्ते व नागरिकांची लगबग वाढली आहे.
९५६ मंडळांद्वारे दुर्गादेवीची स्थापना
By admin | Published: October 02, 2016 2:31 AM