n लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सर्वांना घरे, या संकल्पनेतून केंद्र शासनाने २०२२ पर्यंत देशभरातील बेघरांना घरकुल देण्याची तयारी केली. त्यानंतर गेल्या तीन वर्षात प्रथमच प्रधानमंत्री घरकुल याेजनेसाठी जिल्ह्याला पुरेशा संख्येत घरकुलांना मंजूरी मिळाली आहे. जिल्ह्यासाठी असलेल्या ९२२३ पैकी ८६०१ घरकुलाचे तालुकानिहाय वाटप येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ६२२ घरकुलांचे वाटप आधी झाले आहे तर ३७९ घरकुलांसाठी एससीचे लाभार्थी शिल्लक नसल्याने ते परत जाण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाने सर्वांना घरे हा उपक्रम २०१७ पासून सुरू केला. मात्र, सुरूवातीच्या वर्षात पुरेशा घरकुलांना मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे प्रतिक्षा यादीतील लाभार्थी, दिलेला लक्षांक, मंजूर संख्या तसेच कामाची गती पाहता ठरलेल्या कालावधीत सर्वांनाच घरे मिळण्याची शक्यता मावळली. त्यातच गेल्या तीन वर्षात मंजूर घरकुलांपैकी केवळ ६० टक्के पूर्ण झाली आहेत. ४० टक्के घरकुले अपूर्ण असून त्यापुढील लाभार्थींसाठीचा लक्षांकही मार्च २०२० अखेरपर्यंत प्राप्त झालेला नव्हता. त्यामध्ये केंद्र शासनाची प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, राज्याची रमाई आवास, शबरी, पारधी आवास योजनांचा समावेश आहे. दरम्यान, १० आँक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण कक्षाकडून राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांचा लक्षांक सर्वच जिल्ह्यांना दिला. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यासाठी ९ हजार २२३ घरकुले मिळाली आहेत. त्या घरकुलांचे तालुकानिहाय वाटप करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच लाभार्थ्यांना घरकुले मिळणार आहेत.
९ हजार २२३ घरकुलांचे लवकरच वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2020 11:50 AM